नाशिक : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्याला शरद पवारांचा दुरून आशीर्वाद असल्याचा दावा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर झिरवाळ यांनी शरद पवार यांना 'रामराम' ठोकत अजित पवारांची वाट अंगीकारली. मात्र त्यानंतरही झिरवाळ आपल्या संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यांद्वारे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. झिरवाळ यांना दिंडोरी मतदारसंघातून अजित पवार गटाची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते धनराज महाले यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतून ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला जाणार असल्याने महाले हे महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी गुरुवारी (दि. २४) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा नवा राजकीय वादंग निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीत दोन गट पडले असले, तरी शरद पवार यांचा मला दुरून आशीर्वाद राहणार आहे, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. धनराज महाले यांना मी विनंती करणार आहे. ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा आपल्याला विश्वास असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले. दरम्यान, आता शरद पवार दिंडोरीतून निवडणुकीसाठी नेमके कोणाला रिंगणात उतरवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.