सावंतवाडी : निवडून आल्यानंतर जिल्ह्यात पर्यटन, फलोद्यान, मच्छीमार विकास आणि वन संदर्भात योजना पूर्ण करणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि युवकांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य देणार आहे. येत्या वर्षभरात आपणास निश्चित फरक दिसेल, असा विश्वास व्यक्त करून मी निश्चित जिंकणार असल्याचे महायुतीचे उमेदवार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एक मताने विजयी झाला तरी तो विजय होतो. मी देवाचा भक्त आहे. चांगल्या प्रवृत्तीचा असल्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
द़ृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर अक्कलकोट येथून बोलत होते. ते म्हणाले, मंजूर केलेली सर्व कामे पूर्ण करणार असून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीबरोबर नवीन मेडिकल कॉलेजच्या रुग्ण सोयीबरोबर डी. वाय. पाटील कॉलेजच्या साथीने जिल्ह्यात चांगली रुग्णसेवा लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगधंदे तत्काळ उभारण्याचे काम हाती घेणार असून तरुणांना परदेशात एक लाख नोकर्या उपलब्ध करुन देणार आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Maharashtra assembly polls)
कोकणात एकहाती शिवसेनेचे वर्चस्व राहणार आहे. ज्या जागांवर धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार आहेत त्या सर्व जागा विजय होतील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.