मुंबई : Maharashtra Assembly Polls | विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत 117 उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. तीन महिन्यांपूर्वी विभागवार दौर्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सात उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर आता निवडणुकांचा मौसम सुरू झाल्यावर एका पाठोपाठ एक अशा सहा याद्या जाहीर केल्या. शंभरहून अधिक उमेदवार जाहीर करणारा मनसे हा भाजपनंतर दुसराच पक्ष ठरतो आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्यासह विद्यमान आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव असे अनेक चेहरे निवडणुकीच्या रिंगणात असले तरी चर्चेचा केंद्रबिंदू सध्या माहीम विधानसभेत स्थिरावला आहे. राज यांचे चिरंजीव अमित या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, हे त्याचे निमित्त.
माहिम विधानसभेत अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिंदेंच्या शिवसेनेने येथून उमेदवार मागे घ्यावा, असे सूर उमटू लागले आहेत. विशेषतः, भाजप नेत्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना उमेदवारी दिली. अमित ठाकरेंची वाट मोकळी करणार का, या प्रश्नावर तर ते काय नेहरू लागून गेले का, असा प्रतिप्रश्न संजय राऊतांनी केला. या सर्व गदारोळात मात्र अमित ठाकरेंनी राजकीय टायमिंगचा वडिलांचा गुण आपल्यातही उतरल्याचे मुलाखतीतून दाखवून दिले. माझ्या एक जागेसाठी दहा जागांवर तडजोड करू नका, आम्ही पाठिंबा दिला ती एक भूमिका म्हणून, त्यामागे उपकाराची भावना नाही किंवा परतफेडीची अपेक्षाही नाही, अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली. त्यामुळे महायुतीत काही समझोता झाला आणि शिंदेंचे उमेदवार असलेले विद्यमान आमदार सदा सरवणकरांनी माघार घेतली तरी ते त्यापासून स्वतःला अलिप्त दाखवू शकतात. तूर्तास तरी सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. मात्र, पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू आहेत. चर्चेच्या काही फेर्या झाल्या आहेत. उद्या निर्णय झालाच तर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे होईल. त्याचे पुरेसे भांडवलही केले जाईल.
वांद्रे पूर्वेत मनसेने अद्याप उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाईंविरुद्ध राष्ट्रवादीचे झिशान सिद्दीकी अशी लढत आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीत उमेदवार देणार्या मनसेने इथे उमेदवार दिलेला नाही. सतत राजकीय उद्योग करत राहणार्या मनसेच्या निवडक पदाधिकार्यांमध्ये अखिल चित्रेंचेही नाव असते. ते वांद्रे पूर्वेत सक्रिय असूनही ना त्यांना उमेदवारी दिली, ना आणखी कुणाला. त्यामुळे वरुण सरदेसाईंसाठी मनसेची भूमिका मवाळ वगैरे झाली का, अशी शंका घ्यायला जागा आहे.
माहिमपाठोपाठ वरळी, शिवडी अशा उतरत्या क्रमाने अन्य मतदारसंघांबाबत चर्चा आहेत. वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांची उमेदवारीही लक्षवेधी ठरते आहे. त्यात शिंदे गटाकडून मिलिंद देवराही उभे आहेत.
राज्यभरात शंभराहून अधिक उमेदवार देणार्या मनसेच्या उमेदवारांच्या चर्चेचा अवकाश सध्या मुंबईभोवतीच फिरतो आहे. प्रत्यक्षात जेव्हा राज ठाकरे यांच्या प्रचारसभांना सुरुवात होईल तेव्हाच इतर भागातील उमेदवारांसाठी वातावरण निर्मितीला सुरुवात होणार आहे.
दोन्ही शिवसेनांच्या मतांभोवतीच मनसेचे इंजिन धावणार हे गृहितक आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जवळपास आठवडाभराचा अवधी असल्याने महायुती आणि मनसेत काही समझोता होतो का, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.
117 च्या यादीतील डझनभर नावांचा अपवाद वगळता इतर ठिकाणचे उमेदवार किती मते खेचणार आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार की महायुतीला इतकीच चर्चा आहे.
स्वबळावर 200 ते 225 जागा लढविण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. आजघडीला 117 उमेदवार जाहीर झाले आहेत. ज्योतिषाच्या वळणावरील अंकगणितात त्याचा मूल्यांक वगैरे 9 येतो म्हणतात. 9 या अंकावर राज ठाकरेंचे विशेष प्रेम असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी उमेदवार जाहीर होण्याची शक्यता धूसर मानली जात आहे.