नांदेड : सुमारे सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथील जाहीर सभेस अपेक्षित गर्दी झाली नव्हती. त्याबद्दल नंतर तीव्र नापसंती व्यक्त झाल्यानंतर आता येत्या शनिवारी (दि.९) नांदेडमध्ये येणारे पंतप्रधान तब्बल १६ विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार असून सर्व उमेदवारांवर गर्दी जमविण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार दौऱ्याची सुरुवात गुरुवारी होत असून मराठवाड्यातील पहिली जाहीरसभा नांदेडमध्ये होणार आहे. या सभेच्या संदर्भात भाजपाच्या केंद्रीय तसेच प्रदेश कार्यालयाने लक्ष घातले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी यांनी नांदेड व परभणी येथे स्वतंत्र सभा घेतल्या. नांदेडच्या सभेची वेळ सकाळी ११ वाजता ठरविण्यात आली होती. शहरी मतदारांनी या सभेकडे पाठ फिरवली तर ग्रामीण भागातून निघालेल्या शेकडो गाड्या सभेपूर्वी पोहचू शकल्या नाहीत, त्यामुळे सभास्थानचा मंडप भरला नाही.
अपेक्षित गर्दी न दिसल्यामुळे खुद्द पंतप्रधान नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी यांच्या सभेची तारीख दिवाळीदरम्यानच येथे आली होती. सोमवारी सकाळी महायुतीच्या प्रमुख स्थानिक नेत्यांनी नियोजित सभेच्या ठिकाणी भेट दिली. तेथे उभारण्यात येणाऱ्या भव्य व्यासपीठाच्या जागेत विधिवत पूजा करण्यात आली.
पंतप्रधानांच्या नांदेडमधील सभेची निश्चित वेळ अद्याप जाहीर झालेली नसली, तरी ही सभा दुपारी व्हावी, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपा नेत्यांना कळविले आहे. नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांत महायुतीतील प्रमुख तीन पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे मोदी यांच्या सभेस मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, असे येथे सांगण्यात आले.
शहराजवळच्या कौठा भागात नरेन्द्र मोदी यांचेच नाव धारण करणाऱ्या मैदानात ९ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. सभेचे व्यासपीठ व सभामंडप स्थळावर भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ. अजीत गोपछडे यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे भाजपा उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर, देविदास राठोड, महेश खोमणे यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.