पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील विधानसभेत महायुतीची सत्ता अबाधित राहणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. भाजप-महायुतीची निर्णायक दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. मतमोजणीला चार तासांहून अधिक काळ झाला असून, तब्बल १२४ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. आता राज्यात मुख्यमंत्रीपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. ( Maharashtra Election Results 2024 )
माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, एक प्रचंड असे यश मिळत आहे. आता रडीचा डाव संजय राऊत आणि विरोधक खेळत आहेत. हा लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीत पराभव मोठ्या मनाने स्वीकारावा लागतो. आता संजय राऊत यांनी विमान खाली उतरावे. त्यांना आता वेड्याच्या रूग्णालयात दाखल करावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.
लाडकी बहिण योजना लोकप्रिय ठरली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे सांगत महायुतीच्या कामाला यश आले आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. आता राज्यात ही महायुतीचे सरकार आल्याने मोठ्या प्रमाणात विकास करता येणार आहे, असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.