महाराष्ट्रात पुन्हा एकदा आजपासून देवेंद्रपर्व सुरु झाले. आज गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. बाळासाहेब ठाकरेंना वंदन आणि आनंद दिघेंचे स्मरण करुन शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. पीएम मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.
महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती मुंबईतील आझाद मैदानावर आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अनंत अंबानी, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान, अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता रणवीर सिंग, अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेत्री विद्या बालन यांची प्रमुख उपस्थिती आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी कुटुंबीय, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडूलकर, अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, संजय दत्त, अभिनेता रणबीर कपूर, रणवीर सिंह, विद्या बालन, माधुरी दिक्षित आदी महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत.
देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा आमदार झाले आहेत. आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, याची मला आनंद आहे. त्यांचे जीवन एक संघर्षशील राहिले आहे. त्यांच्यात जिद्द आहे. ते ठरवतात ते करून दाखवतात. जिद्द आणि चिकाटीमुळे ते आज इथेपर्यंत पोहोचले आहेत, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शपथविधीचे पत्र राज्यपालांना दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला आहे. ''एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील'', असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे शपथ घेणार असल्याचे शिवसेना नेते उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी इतर राज्यांतील नेते मुंबईत येत आहेत. आझाद मैदान या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची शपथविधीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहे. त्यासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईतील एअरपोर्ट हे पूर्णपणे पोलिसांचा छावणीत ठेवण्यात आलेले आहे. सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये याकरिता पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. तपासणीहीदेखील करण्यात येत आहे.
आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांचे खास गुलाबी फेटे बांधून स्वागत करण्यात येत आहे. आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून आज या शपथविधी सोहळ्याचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याच शपथविधी कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यातून नागरिक येत असताना अजित पवारांच्या बारामतीमधूनदेखील मोठ्या संख्येने नागरिक येत आहेत. इथे आलेल्या सर्वच मान्यवरांचे गुलाबी फेटा बांधून त्यांचा स्वागत केले जात आहे. अजित पवार यांनी संपूर्ण निवडणुकीत गुलाबी पॅटर्न वापरलेला होता. त्याच अनुषंगाने आता शपथविधी सोहळ्यासाठीदेखील गुलाबी फेटे बांधून अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी आले असल्याचे नागरिकांनी सांगितले.