नवी दिल्ली : प्रशांत वाघाये
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधावरी रात्री भेट घेतली. या भेटीवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार? (Maharashtra Cabinet Expansion) यावर निर्णय झाल्याचे समजते. यानुसार भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अनुक्रमे २०, १२, १० मंत्रीपदे या सुत्रांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळ विस्तार अजून बाकी आहे. या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रात मंत्रिमंडळातील खातेवाटपाचे आणि कोणाला किती मंत्रीपदे याविषयीचे सूत्र ठरवण्यात आल्याचे समजते. सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडे २० कॅबिनेट मंत्रीपद असण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे १० कॅबिनेट मंत्रीपदी असू शकतात.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासाठी १४ डिसेंबरचा मुहूर्त निश्चित मानला जात आहे. गृह खात्यासोबतच नगरविकास खातेही एकनाथ शिंदे यांना वा त्यांच्या शिवसेनेला देण्यास भाजपने नकार दिल्याने शिंदे अस्वस्थ असल्याचे कळते.
आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्यास भाजप राजी नाही. शिवसेनेतील काही आमदारांनीही सत्तार यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती आहे. डॉ. तानाजी सावंत, माजी मंत्री संजय राठोड यांनाही सत्तेत सामील करून घेण्यास भाजपचा विरोध आहे. शिंदे मात्र सावंत यांच्या समावेशाबाबत आग्रही आहेत. सावंत यांनी आरोग्यमंत्री म्हणून उत्तम काम केले असल्याचे त्यांनी भाजपला सांगितले आहे. शिवसेनेने कुणाला मंत्री करावे हे खरे तर एकनाथ शिंदे यांनी ठरविणे अपेक्षित असताना, त्यात भाजप हस्तक्षेप करीत असल्याने शिंदे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.