भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे  Pudhari News Network
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Maharashtra Assembly | 'आम्ही किती दिवस सतरंज्या उचलायच्या'? नाराजांचा तावडेंना सवाल

Vinod Tawde in Nashik : विनोद तावडेंकडून भेटीगाठी आणि नाराजांची मनधरणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भाजप उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवार (दि.28) रोजी नाराज माजी नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वन-टू-वन चर्चा केली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांना मनभेत, मतभेद विसरून कामाला लागल्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पक्षाकडून आयारामांना पदांची खिरापत वाटली गेल्याचे सांगत आम्ही किती दिवस सतरंज्या उचलायच्या असा थेट सवालच नाराजांनी विनोद तावडेंना केला.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोमात आली आहे. सोमवारी(दि.२८) भाजपच्या तिन्ही आमदारांचे अर्ज विनोद तावडे (Vinod Tawde General secretary of Bharatiya Janata Party) यांच्या उपस्थितीत भरण्यात आले. त्याचबरोबर भाजपच्या मिडीया सेलचे उद्घाटनही तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर तावडे यांनी पक्षाच्या कार्यालयात नाराज माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून कामाला लागण्याची गरज आहे, असे तावडे यांनी सांगितले. यावेळी नाराजांनी आपली भूमिका मांडली. पक्षात आयारामांना संधी दिली जाते. निष्ठावंताची कदर केली जात नाही. उमेदवारी वाटप तसेच पक्षाचे पदवाटप करताना दुजाभाव केला जातो. त्यामुळे पक्षनिष्ठा किती दिवस बाळगायची? पक्षावर एकतर्फी प्रेम किती दिवस करायचे?, अशा प्रश्नांची सरबत्ती नाराजांकडून केली गेली. यावर भाष्य करताना भविष्यात तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, याची जबाबदारी पक्षाची असेल, असे तावडे यांनी संबंधितांना आश्वस्त केले. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमधील साधारण पाच ते सहा माजी नगरसेवक, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांमधील दोन ते तीन माजी नगरसेवक तसेच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांमधील सहा ते सात माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी तावडे यांनी वन टू वन चर्चा केल्याचे समजते.

तावडे यांनी दिले स्वत:चे उदाहरण

नाराजांची मनधरणी करताना तावडे यांनी स्वत:चे उदाहरण दिले. एकेकाळी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतरही पक्षनिष्ठा सोडली नाही. पक्षासोबत शांतपणे, संयमाने काम करीत राहिलो. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदापर्यंत पोहोचू शकलो. संघटनेसोबत राहिल्यामुळे भविष्यामध्ये मोठी संधी मिळू शकते, असे तावडे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT