नाशिक : विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात परतण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत 'ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र' या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय स्तरावरच माझे कामकाज असल्याने महाराष्ट्राची जबाबदारी पूर्ण वेळ नसेल, असेही त्यांनी सांगितले. भाजपची नियत साफ असल्याचे नमूद करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गद्दारीला कधीच स्थान दिले नसते, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या मीडिया सेंटरचे उद्घाटन सोमवारी (दि.२८) विनोद तावडे (Vinod Tawde General secretary of Bharatiya Janata Party) यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना तावडे बोलत होते. उद्धव ठाकरे, शरद पवारांवर त्यांनी टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात युतीमध्ये गद्दारीला कधीच स्थान दिले गेले नाही. मात्र त्यांच्यानंतर खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लाडकी बहीण योजना नकोशी आहे. त्यामुळेच या योजनेमुळे इतर योजना बंद होतील, अशी खोटी माहिती ते देत असल्याचे तावडे यांनी यावेळी नमूद केले.
निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेसाठी विधानसभा निवडणुकीत कोणत्या जागांवर पाठिंबा देता येईल, याविषयी भाजप आणि शिवसेना मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे तावडे यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते विजय साने, लक्ष्मण सावजी, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, पवन भगूरकर, सुनील केदार, काशीनाथ शिलेदार आदी उपस्थित होते.
निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असतात. एकाला तिकीट मिळाले म्हणजे कोणीतरी नाराज होणारच. पक्षाच्या माध्यमातून संबंधितांची समजूत घालून त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नाशिकमधील नेत्यांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे नाशिकमधील नाराजांशी चर्चा करणार असून, त्यांची समजूत काढली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार अनेक वर्षे सत्तेत होते. परंतु त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही. भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु कुणीतरी न्यायालयात गेले. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. मंडल आयोग लागू झाला त्यावेळीच मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे होते, असेही तावडे यांनी सांगितले.