Maharashtra Assembly polls | छोट्या पक्षांमुळे बहुरंगी लढती file photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Maharashtra Assembly polls | छोट्या पक्षांमुळे बहुरंगी लढती

एखाद-दोन हजार मते घेण्यामुळे धक्कादायक निकालाची शक्यता

गौरीशंकर घाळे

मुंबई : Maharashtra Assembly polls | महायुती आणि महाविकास आघाडीच्या निमित्ताने सहा पक्षांनी महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचा अवकाश अक्षरशः व्यापला आहे. राज्यातील सत्तेसाठी मुख्य लढत या दोन आघाड्यांमध्ये होणार आहे. या लढाईतील निर्णायक भूमिका मात्र छोट्या पक्षांसह तिसर्‍या, चौथ्या म्हणविल्या जाणार्‍या पक्षांकडे आल्याचे चित्र आहे.

प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे लढती अटीतटीच्या होणार आहेत. त्यामुळे आपापल्या प्रभावक्षेत्रात छोट्या पक्षांचे उमेदवार किती मते घेणार, त्यांच्या मतांचा टक्का महायुतीच्या पथ्यावर पडणार की महाविकास आघाडीला तारणार की, या दोघांच्या लढाईत तिसर्‍याचा लाभ होणार, अशी विविध गणिते सध्या मांडली जात आहेत. या सर्व गणितांची उकल महिनाभराने निकालातच मिळणार असली, तरी राज्यभरात बहुरंगी लढतींचा धुरळा उडणार, हे नक्की झाले आहे. या धुमश्चक्रीत जो घटक निवडणूक यंत्रणा उत्तम राबविणार तोच विजयाचा गुलाल उधळणार आहे. (Maharashtra Assembly polls)

चार महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा द्यायचा किंवा महाविकास आघाडीच्या सोबत जायचे, असे दोनच पर्याय छोट्या पक्षांसमोर होते. स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार्‍या वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षांनाही ए किंवा बी टीमच्या चर्चांना तोंड द्यावे लागले. त्यातल्या त्यात मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा जाहीर करत आपली तात्पुरती सुटका करून घेतली; मात्र मागील पाच वर्षांच्या राजकीय उलथापालथींमुळे सर्वच छोट्या पक्षांचीही दोन गटांत विभागणी झाली आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना, रामदास आठवलेंची रिपाइं, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती, विनय कोरे यांचा जनसुराज्य असे पक्ष महायुतीच्या बाजूने राहिले. शेकाप, समाजवादी पार्टी, डावे पक्ष, लोकभारती अशा पक्षांनी महाविकास आघाडीला साथ दिली. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीसारख्या पक्षांनी प्रसंग पाहून पाठिंब्याचे कार्ड वापरले. आता या सर्वच छोट्या पक्षांना सुगीचे दिवस आले आहेत.

नव्या भिडूंच्या समावेशामुळे जागावाटपाचे पारंपरिक गणित बिघडले. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीची शकले झाल्याने इच्छुकांची नवी फळी समोर आली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मित्रपक्षांसाठी जागा सोडताना पक्षांतर्गत इच्छुकांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महिला आरक्षण लागू झाल्यास पुढची विधानसभा निवडणूक लढविता येणार की नाही, हा प्रश्नही राजकीय नेत्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, या भूमिकेतून तालुका-तालुक्यात इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. मोठ्या पक्षांनी तिकीट नाकारले, तरी छोट्या पक्षांचा पर्याय या इच्छुकांसमोर आहे. त्यामुळे यंदा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढती रंगणार आहेत. त्यामुळे आपसूकच विजयाचे अंतरही तुटपुंजे असणार आहे. परिणामी, एखाद-दोन हजार मते घेणार्‍या उमेदवारामुळेही धक्कादायक निकालाची शक्यता आहे. (Maharashtra Assembly polls)

उमेदवाराच्या प्रभावावरच कामगिरी अवलंबून?

बहुरंगी लढतींमुळे छोट्या पक्षांना चंचुप्रवेशाचीही संधी या निवडणुकांनी दिली आहे. मात्र, गेली पाच वर्षे कधी महायुतीशी सलगी, तर कधी महाविकास आघाडीसोबत राहण्याचा उद्योग सर्वच छोट्या पक्षांनी केला आहे. त्यामुळे आम्ही वेगळे आहोत, आमची विशिष्ट वैचारिक भूमिका आहे किंवा विशिष्ट जात समूहांचे आमचे राजकारण आहे, असे सांगण्याची सोय आता या पक्षांना उरली नाही. स्थानिक पातळीवरील उमेदवाराच्या प्रभावावरच या पक्षांची कामगिरी अवलंबून असणार आहे.

  • बच्चू कडू आणि संभाजीराजे यांच्या आघाडीने अलीकडच्या काळात महायुतीविरोधात सूर आळवले. प्रसंगी आक्रमकपणे संघर्ष केला. अनेक ठिकाणी तिसरी आघाडी म्हणत या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • महायुतीसोबत मनसेने छुपा समझोता केल्याचा आरोप ठाकरे गट करत आहे; मात्र खुद्द अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटाचा उमेदवार भिडणार आहे. त्यामुळे मनसेचा स्वबळाचा नारा कुण्याच्या पथ्यावर पडणार, हे आज तरी गुलदस्त्यातच आहे.

  • वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव ओसरला असला, तरी ही आघाडी जितकी मते घेणार ती भाजपविरोधातीलच असणार, असा दावा महाविकास आघाडी करत आहे. तीच स्थिती मनसेबाबत असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांनी स्वबळावर दोनशे जागा लढविणार असल्याचे सांगत पन्नासहून अधिक उमेदवार जाहीर केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT