कंधार: लोहा विधानसभा मतदार संघात सध्या प्रचाराने जोर धरला आहे. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी व अपक्षांसह १४ उमेदवार मैदानात आहेत. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व त्यांच्या भगिनी आशाबाई शिंदे, एकनाथ पवार, शिवकुमार नरंगले, प्रा. मनोहर धोंडे व चंद्रसेन पाटील अशी पंचरंगी लढत होत असली तरी खरी लढत बहीण-भावात होणार आहे. दुसरीकडे प्रत्येक उमेदवार येथील जातींच्या मतदारांचे गणित लावत आहे.
लोहा कंधार मतदारसंघाची महाराष्ट्रात आगळीवेगळी ओळख आहे. याच मतदार संघाचे माजी आमदार दिवंगत भाई केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी विधीमंडळ गाजविले होते. एकेकाळी शेकापचा गड असलेल्या मतदार संघात काँग्रेस, शिवसेना, अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारही येथे निवडून आले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारसंघात १४ उमेदवार विधानसभेच्या आखाड्यात उत्तरले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी निवडणुकीत स्थिर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मतदारसंघात ओबीसी व मराठा मतदारांचे गणित मांडण्यात उमेदवारांसह कार्यकर्तेही व्यस्त आहेत.
महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रतापराव पाटील चिखलीकर, महाविकास आघाडीकडून शिवसेना (उबाठा) एकनाथ पवार, शेकापच्या आशाबाई शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे शिवकुमार नरंगले, चंद्रसेन पाटील जनहित लोकशाही पार्टी यांच्यासह प्रा. मनोहर धोंडे, संभाजी ब्रिगेडचे सुभाष कोल्हे, आशाताई शिंदे, एकनाथ पवार, पंडीत वाघमारे, बालाजी चुकलवाड, प्रकाश भगनुरे, सुरेश मोरे, संभाजी पवळे असे १४ उमेदवार निवडणूक लढवित आहे.
या निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र निर्माण झाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रतापराव पाटील चिखलीकर, महाविकास आघाडीचे एकनाथदादा पवार, शेकापच्या आशाबाई शिंदे हे प्रमुख मराठा उमेदवार मैदानात आहेत. तर शिवकुमार नरंगले, प्रा. मनोहर धोंडे व चंद्रसेन पाटील असे प्रमुख तीन ओबीसी उमेदवार या आखाड्यात उतरले आहेत.
प्रत्येक उमेदवार आपापल्या जातीच्या आकडेवारीची गणित जुळवित आहेत. असे असले तरी या मतदारसंघातील माझी आमदार रोहिदास चव्हाण, शंकरअण्णा धोंडगे, ईश्वरराव भोसीकर, ड. मुक्तेश्वर धोंडगे, डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांची भुमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. सख्या बहिण-भावाच्या लढती सोवत या मतदारसंघात पंचरंगी लढतीत बाजी कोण मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.