छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सोमवारी (दि.२८) उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दाखल केले. यात जैस्वाल यांच्यासह त्यांची दोन्ही मुले व सुनांच्या नावे २५.३९ कोटींची संपत्ती आहे. त्यात ५ कोटी ६४ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. तर सर्वाधिक १.८९ कोटी रुपयांची संपत्ती आमदार जैस्वाल यांच्या नावे आहे.
तसेच साडेतीन कोटींची त्यांची आर्थिक गुंतवणूक आहे. त्यांच्या नावे अलिशान कार ३३ लाख किमतीचे ४२० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. याशिवाय बँकेकडून त्यांनी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. मात्र काही संस्था आणि व्यक्तींना ५.७४ कोटी रुपये देणे आहे. प्लॉटस, व्यावसायिक कॉम्पलेक्स अशी १६.२३ कोटींची मालमत्ता आहे. तर वारसाहक्काने त्यांच्याकडे २.६७ कोटींची मालमत्ता आली आहे. असे ते जवळपास १९ कोटींचे मालक असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.
आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याविरुध्द मुंबई पोलिस कायद्याअंतर्गत सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर २०१९ मध्ये क्रांती चौक पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अडीच हजारांचा दंड आणि सहा महिने सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली होती.
या शिक्षेविरोधात जैस्वाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते. खंडपीठाच्या आदेशानुसार १९ जून २०२१ रोजी दिलेल्या आदेशाअंतर्गत स्थगिती देण्यात आली असून, तो कायम आहे.