उमरखेड, पुढारी वृत्तसेवा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. या काळात सर्वाधिक सत्ता काँग्रेसने भोगली. परंतु लोकांच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केले. आम्ही शेतकरी शेतमजुरांना केंद्रस्थानी ठेवून देशाचा विकास केल्यााने आजदेशात प्रगतीचे वारे वाहत आहेत, असे प्रतिपादन, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी उमरखेड येथे केले.
ते येथील भाजपाचे उमेदवार किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. ते म्हणाले गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांना भ्रमित करण्याचे काम काँग्रेसने केले. ४०० पार झाल्यास संविधान बदलणार, असा अपप्रचार केला. परंतु काँग्रेसच्या या भूलथापांना महाराष्ट्रातील जनता यावेळी बळी पडणार नाही असे ते म्हणाले.
जातीयवादावर लक्ष्य केंद्रित न करता देशातील प्रत्येक नागरिकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने दहा वर्षे काम केले, याही पुढे विकास हाच आमचा अजेंडा आहे, असे ते म्हणाले. यावेळी आमदार नामदेव ससाने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, महादेव सुपारे, अंबादास साकळे, महिंद्र मानकर, आरती फुफाटे, इरफान कुंदन, महेश काळेश्वरकर, श्याम भारती महाराज, चितांगराव कदम, प्रवीण मिराशे आदी उपस्थित होते.