बीड, पुढारी वृत्तसेवा: बीडमधून डॉ. योगेश क्षीरसागर यांना तिकिटाची लॉटरी लागली असे बोलले जाते. परंतु उमेदवारी मिळविण्यामागचे प्रयत्न आपल्याला दिसत नसतात. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे पंकजाताई मुंडे यांचे काम करणाऱ्या डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी आता बीडची भाजप पूर्ण ताकदीने काम करेल. त्यांच्या विजयात भाजपचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास भाजप नेत्या, माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला.
मुंडे बहिण-भावाने बीडचे महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद पाठीशी उभी केली असून त्यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये डॉ. प्रितमताई मुंडे यांची सोमवारी (दि.११) प्रचार सभा पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर डॉ. प्रितमताई मुंडेंसह उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस ड. सर्जेराव तांदळे, डॉ. सारिकाताई क्षीरसागर, चंद्रकांत फड, अजय सवाई, नवनाथ शिराळे, जगदीश गुरखुदे, अशोक लोढा, संगिता धसे, सलीम जहांगीर, देविदास नागरगोजे, जालिंदर सानप, वैजनाथ मिसाळ, विक्रांत हजारी यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, आपल्याला डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने उच्चशिक्षित, संयमी उमेदवार लाभला आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत कुठलेही किंतु परंतु न करता प्रामाणिकपणे पंकजाताई मुंडे यांचे काम केले. आता त्यांच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीने काम करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत. डॉ. योगेश क्षीरसागर यांना विधानसभेत पाठवायचे आहे, अशा शब्दात डॉ. प्रितमताई मुंडे यांनी यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचलन करून शांतिनाथ डोरले यांनी आभार मानले. मी कायम विकासाच्या मुद्यावर राजकारण, समाजकारण करत आलो आहे. आता बीड विधानसभा व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक 'घडी' बसविण्याची 'वेळ' आली आहे. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्याकडून कायम सन्मानाची वागणूक मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थेसह इतर ठिकाणी सर्वांना समान वाटा मिळेल, अशी ग्वाही डॉ. योगेश क्षीरसागर यांनी दिली.