Maharashtra Assembly Polls | हरियाणातून 'मविआ'ने धडा घेतला की नाही? file photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Maharashtra Assembly Polls | हरियाणातून 'मविआ'ने धडा घेतला की नाही?

दिल्लीत बैठकांमागून बैठका; मात्र काही जागांवरील पेच सुटता सुटेना

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रशांत वाघाये

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले. २० नोव्हेंबरला मतदान, तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. सर्वच राजकीय पक्षांजवळ केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. या सगळ्यांमध्ये भाजपने ९९ उमेदवार जाहीर करत जागावाटपामध्ये आघाडी घेतली. महायुती, महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती अशा तीन आघाड्या महाराष्ट्रात निवडणुका लढत आहेत. प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या बैठका राजधानी दिल्लीत होत आहेत. (Maharashtra Assembly Polls)

मागील तीन दिवस महाराष्ट्रातील सर्व प्रमुख काँग्रेस नेते दिल्लीत तळ ठोकून आहेत. छाननी समितीची बैठक तसेच केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीच्या निमित्ताने हे सर्व नेते दिल्लीत आहेत. मात्र या दोन्ही बैठका नियोजित दिवसाच्या एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या. याला कारण काहीही देण्यात आले असले तरी महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील पेच सुटत नाही हे यातले खरे कारण आहे. काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटानेही हक्क सांगितला आहे. या जागा प्रामुख्याने काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भातील आहेत. शरद पवार गटाच्या आणि ठाकरे गटाच्या या भूमिकेचा काँग्रेसने कडाडून विरोध केला आणि तशी भूमिका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर मांडली. शिवसेना ठाकरे गटही या जागांसाठी आग्रही असून ताठर भूमिका घेत आहे. त्यामुळे अधिक ताणले तर तुटेल, अशा शब्दांत काही नेत्यांना मध्यस्थी करावी लागत आहे. (Maharashtra Assembly Polls)

जागावाटपाचा वाद वाढण्याचे कारण म्हणजे ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटालाही वाटते. त्यामुळे आपल्या पक्षाच्या जास्त जागा याव्यात, असे सर्वांना वाटते. निवडणुकीपूर्वीच कोण होणार मुख्यमंत्री या प्रश्नाने महाविकास आघाडीला ग्रासले आहे. २८८ पैकी किती जागांचा तिढा नक्की बाकी आहे, हे स्पष्टपणे कोणीही सांगायला तयार नाही. शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसलाही आपण मोठ्या भावाच्या भूमिकेत राहावे, असे वाटत आहे. मुख्यमंत्रिपद हे यामागचे कारण आहे. मात्र ते मिळवण्यासाठी सर्वात आधी बहुमत मिळवणे आवश्यक आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.

अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही...

शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री असतानाही महायुती मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणुकीला सामोरी जात आहे. जागावाटपाचे सूत्र महायुतीमध्ये सुलभतेने सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीमधील अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीने सरकार बनवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. हे समजूनही जागावाटपाचा पेच वाढतोय, याचाच अर्थ हरियाणा विधानसभा निवडणुकीतून काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने काही धडा घेतला की नाही, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. (Maharashtra Assembly Polls)

वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नडल्या

काही दिवसांपूर्वी हरियाणा विधानसभेचे निकाल लागले. हरियाणा विधानसभा काँग्रेसच जिंकेल या विश्वासासह काँग्रेसमधून मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र काँग्रेसला हरियाणामध्ये सरकार बनवता आले नाही. सरकार स्थापनेसाठी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नडल्या, असे म्हणत ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मागरिट अल्वा यांनी सुनावले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT