नाशिक : नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख पक्षांच्या उमेदवाऱ्या घोषित झाल्यानंतर आता सर्वच पक्षांत बंडखोरांचे पीक उफाळून आले आहे. बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, 'इच्छुकांचे बंड कसे होईल थंड?' हाच प्रश्न आता महाविकास आघाडी आणि महायुतीला पडला आहे.
नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीला बंडाळीचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या नाशिक मध्यमधून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. पक्षनिरीक्षक परेश धानानी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार डॉ. पाटील यांनी केल्याने महाविकास आघाडीच्या अडचणीत भर पडली आहे.
देवळाली मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटात रस्सीखेच सुरू होती. या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाने पुन्हा माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी दिल्याने घोलप विरोधक एकवटले आहेत. विरोधकांना शांत करण्याचे आव्हान आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना पेलावे लागणार आहे. विशेषत: बंडाचे निशाण फडकविणाऱ्या इच्छुकांची मनधरणीचे मोठे आव्हान आहे. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांना यात लक्ष घालावे लागणार आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बंडाळीचा सर्वात मोठा फटका भाजपला बसला आहे. भाजपने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी दिल्यानंतर या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या माजी सभागृहनेते दिनकर पाटील मनसेची वाट धरत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले शशिकांत जाधवही अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. अन्य काही इच्छुक शरीराने भाजपत दिसत असले तरी ते मनाने केव्हाच विरोधकांच्या गोटात सामील झाले आहेत. ठाकरे गटातील माजी महापौर दशरथ पाटील यांनीदेखील तिसऱ्या आघाडीचा पर्याय निवडत स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत.
नाशिक मध्य, पश्चिम आणि देवळालीप्रमाणेच नाशिक पूर्व मतदारसंघातही बंडाळी दिसून येत आहे. भाजपची उमेदवारी न नाराज झालेल्या गणेश गिते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारी मिळविली आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या जगदीश गोडसे यांनी उमेदवारी न मिळाल्याने सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप हे शांत आहेत. त्यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. या निवडणुकीत ते 'समाजा'बरोबर राहणार की पक्षाबरोबर हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पूर्व मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.