ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटांनी दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आणि सेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यानुसार दिघे यांनी आज शक्तिप्रदर्शन करीत कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सेना नेते राजन विचारे नरेश मनेरा यांच्यासह अनेक महाआघाडीचे स्थानिक नेते उपस्थित होते.
मंत्री एकनाथ शिंदे यांना कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अडकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने दिघेअस्त्र वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केदार दिघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवंगत आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली . शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून केदार दिघे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारत त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्धार करीत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे आगामी काळात शिंदे विरुद्ध दिघे अशी लढाई संपूर्ण राज्याला पाहायला मिळेल.