अजित पवार आणि शरद पवार.  (file photo)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

कराड उत्तर अन् दक्षिण, पाटणमध्ये संघर्ष पेटणार; थोरल्‍या पवारांनी केला गट मजबूत

हरिष पाटणे

सातारा जिल्ह्यावर पूर्वी शरद पवारांचे वर्चस्व राहिले, मात्र मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस व नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या जिल्ह्यात आपली हवा निर्माण केली. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर शरद पवार व अजित पवार गटात उभा दावा निर्माण झाला. दोन प्रबळ गट तयार झाले होते; मात्र शरद पवारांनी अजित पवार गट फोडून आपला गट मजबूत केला आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांकडे मकरंद पाटील वगळता दाखवायला मोठा नेता शिल्लक नाही. त्यामुळेच थोरले पवार बालेकिल्ल्यावर पुन्हा झेंडा फडकवणार का? देवेंद्र फडणवीस त्यांना किती थोपवणार याविषयी उत्सुकता आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघाचे सध्याचे चित्र पाहता लढाई जोरदार रंगण्याची चिन्हे आहेत.

बाळासाहेबांविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी?

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळासाहेब पाटील हेच निवडणूक रिंगणात असतील. महायुतीतून हा मतदारसंघ भाजपला जाणार की अजित पवार गटाला याची चर्चा सुरू आहे. भाजपमधून जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व मनोज घोरपडे हे टोकाचे इच्छुक आहेत. या मतदारसंघात गेल्या दोन खेपेला अशीच तिरंगी लढत झाली आहे. त्याचा फायदा बाळासाहेब पाटील यांना होत आला आहे. या खेपेलाही फारसा बदल त्यात दिसत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची मते या मतदारसंघात वाढली आहेत. त्यामुळेच एकास एक लढत झाली तर बाळासाहेब पाटील यांच्यासाठी काट्याची लढाई असणार आहे; मात्र धैर्यशील कदम व मनोज घोरपडे हे दोघेही थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यातच उदयनराजेंचे समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनीही या मतदारसंघात स्वतंत्र मेळावे घेऊन हवा निर्माण केली आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र डुबल हेही लढण्याच्या पवित्र्यात आहेत. त्याचबरोबर रामकृष्ण वेताळ हेही इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांविरोधात नेमका तगडा उमेदवार कराड उत्तरेत कोण? यावरच उत्तरेचे उत्तर अवलंबून आहे.

Karad politics : पृथ्वीराजबाबांना अतुलबाबा टक्कर देणार का?

कराड दक्षिणेत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपचे डॉ. अतुल भोसले अशी सरळ लढत होणार आहे. या मतदारसंघात लोकसभेला महाविकास आघाडीची कमालीची पिछेहाट झाली आहे. भाजप व महायुतीचे मतदान वाढल्याने डॉ. अतुल भोसले यांचा गट कमालीचा चार्ज झाला आहे. त्याचवेळी पृथ्वीराज चव्हाणही सावध झाले असल्याने त्यांनी राज्य भाजपच्या व महायुतीच्या कारभारावर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करणार असल्याने या मतदारसंघात हेवीवेट लढत होईल. त्याचवेळी माजी मंत्री स्व. विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह उंडाळकर यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह उंडाळकरांशिवाय शरद पवार यांचा गट हे सगळे एकत्र असतानाही लोकसभेला महायुती प्लस असल्याने विधानसभेला परिस्थिती काय असेल याविषयी अटकळी बांधल्या जात आहेत.

पाटणच्या लढाईत साहेब की सरकार?

पाटण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात दिसतील. त्यांच्याविरोधात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर हेच उमेदवार असतील. याशिवाय उद्धव ठाकरे गटाचे नेते हर्षल कदम यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मध्यंतरी शंभूराज देसाई व हर्षल कदम यांच्या गटात जोरदार तणातणी झाली होती. शंभूराज देसाई यांनी मंत्रिपदाचा सर्वाधिक लाभ पाटणला मिळवून दिला आहे. त्या जोरावर ते निवडणूक लढवतील मात्र शरद पवारांची जादू महाराष्ट्रात सुरू असल्याने पाटणकरांसाठी शरद पवार पाटण मतदारसंघात जास्त वेळ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातील पारंपरिक लढत शंभूराज विरुद्ध पाटणकर अशीच होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT