पूर्व विदर्भात महायुती-मविआत चुरशीच्या लढती ! File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

पूर्व विदर्भात महायुती-मविआत चुरशीच्या लढती !

पुढारी वृत्तसेवा

नागपूर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ येतात. शहरातील पूर्व विधानसभा मतदार संघ भाजपचे कृष्णा खोपडे यावेळीही प्रथळ दावेदार असले तरी अजित पवार गटातर्फे महिला आयोग सदस्य आभा पांडे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. महाविकास आघाडीतर्फे दुनेश्वर पेठे, किशोर कुमेरिया, माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, पुरुषोत्तम हजारे असे इच्छुक असल्याने हा मतदारसंघ चरशीचा ठरू शकतो. मध्य नागपूर विधानसभा मतदार संघात विकास कुंभारच कायम राहणार की मतदक्षा परिवर्तन घडवणार हे लवकरच कळणार आहे. काँग्रेसचे बंटी शेळके, नंदा पगते, अतुल कोटेचा इच्छुक आहेत. (Maharashtra Politics)

पश्चिम नागपूर मतदार संघात कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना 'वॉक ओव्हर' मिळेल असे बोलले जाते. नरेंद्र जिचकार, दया शंकर तिवारी, संदीप जोशी असे इच्छुक आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा रंगतदार लढतीच्या तयारीत महाविकास आघाडी आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांचे नाव येथून चर्चेत असले तरी परंपरागत प्रतिस्पर्धी प्रफुल्ल गुडघे हेच उमेदवार असतील, असे दिसते. सध्या फडणवीस - गुडधे पोस्टरयुद्ध जोरात आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार मोहन मते यांच्यापुढे कॉंग्रेसचे गिरीश पांडव हे तगडे उमेदवार असताना लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधिक्य लक्षात घेता काँग्रेस उमेदवार बदलाची चर्चा जोरात आहे. विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे किशोर कुमार, दुष्यंत चतुर्वेदी असे शिवसेनेचेही इच्छुक आहेत. राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत काँग्रेसचा गड कायम ठेवतील, अशी चिन्हे असताना भाजपमध्ये उमेदवारीसाठी धर्मपाल मेश्राम, संदीप गवई, डॉ. मिलिंद माने असे अनेक दावेदार आहेत. शहरात सद्यस्थितीत चार जागा भाजपकडे तर दोन जागा काँग्रेसकडे आहेत.

काटोल विधानसभा मतदार संघात माजी मंत्री अनिल देशमुख यांची पुन्हा कसोटी लागणार आहे. त्यांच्याविरोधात त्यांचे पुतणे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर, समीर उमप, सतीश शिंदे असे महायुतीत दावेदार आहेत. सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघ माजी मंत्री, काँग्रेस नेते सुनील केदार आमदारकी रद्द झाल्यामुळे अपात्र ठरल्याने काँग्रेस, भाजपचे उमेदवार कोण, यावर सर्व खेळ आहे. रामटेक विधानसभा मतदार संघात अॅड. आशिष जैस्वाल सध्या महायुतीचे दावेदार असले तरी माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी भाजपवर दडपण वाढविले आहे. काँग्रेसतर्फे माजी मंत्री राजेंद्र मुळक दावेदार आहेत. उबाठा गटाचे विशाल बरबटे यांनी मविआची अडचण वाढविली आहे. उमरेड विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे माजी आमदार राजू पारवे लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेत गेल्याने या मतदारसंघात महायुती पुन्हा त्यांना संधी देते की भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे, अरविंद गजभिये यांच्या निमित्ताने नशीब आजमावते हे लवकरच कळणार आहे.

Maharashtra Politics : वर्धा जिल्हा तिकिटांकरिता रस्सीखेच

वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ, चंद्रपूरला धानोरकर-वडेट्टीवार स्पर्धा, गडचिरोलीत आत्राम कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला, तर वर्धा विधानसभा मतदार संघात भाजपचे पंकज भोयर आमदार आहेत. भाजपकडून येथेही स्पर्धा नाकारता येत नाही. काँग्रेसकडून अभुदय मेघे, शेखर शेंडे, डॉ. सचिन पावडे, राजेंद्र उट्टलवार सुधीर पांगुळ, हेमलता मेघे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नितेश कराळे, समीर देशमुख इच्छुक आहेत.

आर्वी मतदार संघात भाजपचे आमदार दादाराव केचे पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सुमित वानखेडे यांचेही नाव भाजपकडून जोरात आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस की कॉंग्रेस असा प्रश्न आहे. काँग्रेसकडून मयुरा अमर काळे यांचेसोबतच शैलेश अग्रवाल, अनंत मोहोड, स्वप्निल ऊर्फ बाळा जगताप ही नावे चर्चेत आहे. देवळी मतदार संघात काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यासोबतच चारुलता टोकस यांनी उमेदवारी मागितली आहे. भाजपकडून राजेश बकाने यांचे नाव चर्चेत आहे. शिंदे गट शिवसेनेकडून माजी आमदार अशोक शिंदे, गणेश इखार ही नावे चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून समीर देशमुख यांनीही उमेदवारी मागितली आहे. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात आमदार समीर कुणावार यांची एकमेव दावेदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अतुल वांदिले, सुधीर कोठारी ही नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडून अर्चना भोमले, पंढरी कापसे यांनी अर्ज केला आहे.

गडचिरोलीत आत्राम कुटुंबातच होणार घमासान

आरमोरीत कृष्णा गजबे हेच भाजपचे दावेदार आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार आनंदराव गेडाम, रामदास मसराम, डॉ. शिलू चिमूरकर आदी इच्छुक आहेत. ही जागा शिवसेना (उबाठा) कडे गेल्यास अविनाश गेडाम व माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. गडचिरोलीत भाजपकडून डॉ. देवराव होळी यांच्याशिवाय माजी खासदार अशोक नेते, डॉ. नामदेव उसेंडी हे इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. विश्वजित कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, डॉ. सोनल कोवे, वर्षा आत्राम, माधुरी मडावी यांची नावे चर्चेत आहेत. ही जागा शिवसेनेच्या (उबाठा) कोट्यात गेल्यास शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख विलास कोडापे, जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके लहू शकतात.

अहेरी मतदार संघात अजित पवार गटाचे धर्मरावबाबा आत्राम सध्या आमदार व मंत्री आहेत. महायुतीमध्ये ही जागा पुन्हा अजित पवार गटाकडे गेल्यास धर्मरावबाबा आत्राम हेच निवडणूक लढतील. भाजपकडून माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम प्रयत्नशील आहेत. महायुतीकडून तिकीट न मिळाल्यास ते अपक्षही निवडणूक लढू शकतात. धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीने भाग्यश्री आत्राम यांना तिकीट दिल्यास ही लढत आत्राम कुटुंबाच्या प्रतिष्ठेची असणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर मतदार संघात अपक्ष व सध्या महायुतीसोबत असलेले किशोर जोरगेवार हे आमदार आहेत. त्यांच्यावरच महायुती विश्वास टाकू शकते. बल्लारपूरमध्ये भाजप नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विद्यमान आमदार आहेत. ते विधानसभेत नक्की जातील असे दिसते. मविआतर्फे तगडा उमेदवार दिल्यास लढत जोरदार होऊ शकते.

राजुरा मतदार संघात काँग्रेसचे सुभाष घोटे विद्यमान आमदार असून त्यांचेच पारडे जड आहे. वरोरा मतदार संघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर २०१९ मध्ये विजयी झाल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर ही जागा रिक्त आहे. प्रतिष्ठेच्या लढतीत धानोरकर कुटुंबातील सदस्य चर्चेत आहेत. चिमूरमध्ये भाजपचे कीर्तिकुमार भांगडिया विद्यमान आमदार आहेत. भांगडिया यांच्याशिवाय भाजपकडून वसंत वारजूरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसमध्ये माजी आमदार अविनाश वारजूरकर, शिवानी वडेट्टीवार चर्चेत आहेत. ब्रह्मपुरीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसकडे वडेट्टीवार हेच एकमेव उमेदवार आहेत. भाजपकडून माजी आमदार प्रा. अतुल देशकर, वसंत वारजूरकर, भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नावाची चर्चा आहे. गोंदियात अपक्ष आमदार विनोद अग्रवाल, माजी आ. गोपालदास अग्रवाल (काँग्रेस), माजी आ. रमेश कुथे (शिवसेना, उबाठा), माजी आ. राजेंद्र जैन (राकाँ, अजित पवार) अशी चुरस आहे. ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल काँग्रेसमध्ये परतल्याने उत्सुकता आहे. तिरोडा मतदार संघात भाजप आमदार विजय रहांगडाले, ओम कटरे (भाजप), जितेंद्र कटरे (काँग्रेस), राधेलाल पटले (काँग्रेस), जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले (भाजप), रविकांत बोपचे (राकों, शरद पवार गट), धर्मेंद्र तुरकर (भाजप), अॅड. टी. बी. कटरे (काँग्रेस) असे इच्छुक आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी मंत्री राजकुमार बडोले (भाजप), अजय लांजेवार, निशांत राऊत (काँग्रेस), मिथुन मेश्राम (राकाँ, शरद पवार गट) आणि विजय खोब्रागडे (काँग्रेस) असे इच्छुक आहेत. आमगाव देवरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस आमदार सहेसराम कोरोटे, माजी आ. संजय पुराम (भाजप), राजकुमार पुराम (काँग्रेस), रमेश ताराम (राकाँ, अजित पवार गट दावेदार आहेत तर भंडारा विधानसभा मतदार संघात शिंदे गट शिवसेनेचे आ. नरेंद्र भोंडेकर, नरेंद्र पहाडे (उद्धव ठाकरे गट), आशिष गोंडाने (भाजप) चुरस आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT