खटाव : निवडणूक हातातून गेल्याची जाणीव झाल्यामुळे आ. महेश शिंदे आणि त्यांच्या बहिणीकडून पुसेगाव पोलिसांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीच्या कार्यकाळात पोलिस प्रशासन एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. यापुढे कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी दिला.
बुधवारी पुसेगाव पोलिस ठाण्यावर आ. शशिकांत शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी निषेध मोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुसेगाव पोलिस ठाणेंतर्गत गावांतील नागरिक व महविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, आ. महेश शिंदे यांचा तमाशाच्या फडात बसलेला व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून पुसेगाव पोलिसांनी कोणतीही तक्रार नसताना डिस्कळ येथील ओमकार शिपटे या युवकाला बोलावून घेऊन महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांसमोर अमानुषपणे मारहाण करून त्याचा मोबाईल जप्त केला. ही निंदनीय बाब आहे.
तसेच विकास कामांवर मते मागायची सोडून विद्यमान आमदारांकडून महविकास आघाडीचे कार्यकर्ते व सामान्य नागरिकांवर मतदानासाठी दबाव आणून धमक्या दिल्या जात आहेत. या अन्यायायाविरोध कारवाई करायची सोडून येथील काही पोलिस कर्मचारी नागरिकांवर दबाव आणून एका राजकीय पक्षाचे काम करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्माण केलेल्या प्रशासनाच्या पोलिस ठाण्यातच राजकारण करणार्या पोलिसांची त्वरित चौकशी करण्यात यावी. तसेच निरपराध नागरिकांना मारहाण करणारे पोलिस आणि त्यांना आदेश देणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी आ. शिंदे यांनी केली.
दरम्यान, पुसेगाव पोलिस ठाणे महेश शिंदे यांच्याकडे ठेकेदारीवर चालवायला दिले असून येथील पोलिस कर्मचारी रोजंदारीवर काम करत असल्याचे मत सागर साळुंखे यांनी मांडले. आ. महेश शिंदे हे पोलिसांच्या माध्यमातून नागरिकांच्या अगदी साध्या-साध्या आणि खाजगी गोष्टींत लक्ष घालत आहेत. असा लोकप्रतिनिधी आपल्याला लाभला ही दुर्दैवाची बाब असल्याचे मेघराज निकम यांनी सांगितले. पोलिस अवैध धंद्यांना अभय देत असून राजरोसपणे हप्ते गोळा करत आहेत. संबंधित अधिकार्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी संदीप जाधव यांनी केली. जोतीनाना सावंत, गौरव जाधव यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
झालेल्या घटनेची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल मागवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी फोनवरून बोलताना आ. शशिकांत शिंदे यांना दिले. त्यानंतर निषेध मोर्चा थांबवण्यात आला.