नाशिक जिल्ह्यात 'मविआ'चा सुपडा साफ Pudhari News network
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Election Result Nashik | नाशिक जिल्ह्यात 'मविआ'चा सुपडा साफ

१५ पैकी १४ जागांवर महायुतीचा विजय, एमआयएमने एक जागा राखली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील निकालाचा ट्रेंड नाशिक जिल्ह्यातही कायम राहिला असून, जिल्ह्यातील विधानसभेच्या १५ पैकी १४ जागा लढविणाऱ्या महायुतीने सर्वच १४ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला धूळ चारली. सर्वाधिक ७ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्ह्यात मोठा भाऊ ठरला असून, भाजपला पाच, तर शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात निसटता विजय मिळवत एमआयएमने आपली जागा राखली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील दुफळीनंतर अवघ्या दोन जागा उरलेल्या महाविकास आघाडीचा या निवडणुकीत पुरता सुपडा साफ झाला आहे.

नाशिकची निवडणूक यंदा कांदा, सोयाबीन प्रश्न, शेतकरी आत्महत्या, परराज्यात गेलेले उद्योग, बेरोजगारी, महागाई यासह हिंदुत्व, मराठा आरक्षण आदी मुद्यांभोवती फिरली; परंतु लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज आणि 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवर विश्वास ठेवत जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकले. नाशिक शहरातील नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम या तीनही जागा भाजपने राखल्या. नाशिक पूर्वमधून ॲड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गिते यांना धूळ चारत सलग दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे यांनी त्यांचे पारंपरिक विरोधक शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गिते यांना मात देत विजयाची हॅट्ट्रिक साधली. तर नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे यांनीदेखील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा दणदणीत पराभव करत मोठ्या मताधिक्याने सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केला. शहर व ग्रामीण मतदार असलेल्या देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांना धोबीपछाड दिली. या मतदारसंघात ठाकरे गटाचे योगेश घोलप यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मालेगाव मध्य मतदारसंघातून मौलाना मुफ्ती यांनी एमआयएमचा गड राखला असून, दिंडोरीत विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांनी विजय मिळविला. कळवण मतदारसंघात अजित पवार गटाचे नितीन पवार यांनी जागा कायम राखली, तर चांदवड-देवळा मतदारसंघात भाजपचे डॉ. राहुल आहेर यांनी चुलतबंधू अपक्ष केदा आहेर यांना पराभवाची धूळ चारत विजयाची हॅट्ट्रिक साधली. निफाडमधून अजित पवार गटाचे दिलीप बनकर यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे अनिल कदम यांच्यावर विजय मिळविला, तर सिन्नरमधून अजित पवार गटाचे अॅड. माणिकराव कोकाटे यांनी शरद पवार गटाच्या उदय सांगळे यांना पराभूत केले. इगतपुरीत अजित पवार गटाचे हिरामण खोसकर यांचा करिष्मा कायम असून, त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय संपादित केला. बागलाणमध्ये भाजपच्या दिलीप बोरसे यांनी एकतर्फी विजय मिळवत जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २९ हजार ३६८ मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला आहे.

भुजबळ, भुसेंचा पाचव्यांदा विजय

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ येवल्यातून, तर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघातून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आव्हानानंतर भुजबळ यांना निवडणूक अवघड बनेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु विरोधकांचे सर्वच अडथळे बाजूला सारत भुजबळांनी येवल्याचा गड सर केला. जरांगे फॅक्टरचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. मालेगाव बाह्य मतदारसंघातूनही दादा भुसे यांनी कधीकाळी त्यांचे सहकारी असलेल्या अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला असून, ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

नांदगावकरांचे सुहास कांदेंनाच बळ

नांदगाव मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या पुढे तगडे आव्हान उभे केले होते. निवडणुकीदरम्यान कांदे यांनी भुजबळ यांना दिलेली जीवे मारण्याच्या धमकीची चर्चा राज्यभरात गाजली. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु गेल्या पाच वर्षांतील केलेल्या कामांच्या जोरावर कांदे यांनी नांदगावचे मैदान मारले. त्यामुळे समीर भुजबळ यांना पराभव पत्करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT