नवी दिल्ली: ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) ने आज दिल्लीत तिरंगा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. काही तासांपूर्वीच सीजेपी प्रमुख अभिजीत दीपकेंनी आपल्याला पोलिसांकडून ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली होती. त्यानंतर दुपारीच दीपके यांच्या झंडेवालान येथील निवासस्थानी दिल्ली पोलीस पोहोचले आहेत.
दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना नोटीस बजावली आहे. पोलिसांचे एक पथक दीपके यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कनॉट प्लेसमध्ये कलम १६३ लागू आहे आणि तिरंगा यात्रेसाठी एनडीएमसीकडून कोणतीही परवानगी नाही; तरीही जर त्यांनी कनॉट प्लेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तर ते कलम १६३ चे उल्लंघन ठरेल.
मतदारांच्या नावनोंदणीतील कथित अनियमिततेविरोधात सीजेपीचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सीजेपी आणि दिल्ली पोलीस यांच्यातील हा नवीन संघर्ष समोर आला आहे. दिल्ली पोलिसांचे सुमारे डझनभर अधिकारी, ज्यामध्ये महिला पोलिसांचीही मोठी संख्या आहे, दिपके यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
दिपके यांना ताब्यात घेण्यात आले आहे की त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, याबद्दल दिल्ली पोलिसांकडून कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही. गुरुवारी दिल्लीत पोहोचलेल्या दिपके यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांना सांगितले होते की, काही वाहने ज्यांना नंबर प्लेट्स नाहीत त्यांचा पाठलाग करत आहेत आणि 'इंटेलिजन्स ब्युरो' (IB) चे कर्मचारी त्यांच्या निवासस्थानावर लक्ष ठेवून आहेत.