बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

डहाणूमध्ये मतदानाआधी 'बविआ'ला धक्का: उमेदवार सुरेश पाडवींचा भाजपमध्ये प्रवेश

Suresh Padvi join BJP | Maharashtra Assembly Polls | डहाणू मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार

पुढारी वृत्तसेवा

डहाणू पुढारी वृत्तसेवा : डहाणू विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. या घडामोडींमुळे डहाणू मतदारसंघातील निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे.

पाडवी यांचा इतिहास आणि राजकीय भूमिका

काही महिन्यांआधी पाडवी यांनी भाजप उपजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बहूजन विकास आघाडीमध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला होता. बविआमधून त्यांना डहाणू मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली होती. पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे पालघर उपाध्यक्ष होते आणि डहाणू मतदारसंघात त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रचार केला होता. मतदारसंघामध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर भाजपला पाठिंबा दिल्याने समीकरणे बदलणार आहेत.

विरारमधील वाद आणि डहाणूतील रणनीती

काही तासांपूर्वी विरार येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांना पैसे वाटप करताना पकडल्याचा आरोप केला होता. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. परंतु, लगेचच भरत राजपूत यांनी डहाणूमध्ये पाडवी यांना भाजपमध्ये सामील करून घेत विरोधकांवर मात केली आहे.

संभाव्य परिणाम

पाडवी यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीतील समीकरणे पुन्हा नव्याने रचली जात आहेत. भाजपला मिळालेला हा पाठिंबा विरोधकांसाठी धक्का मानला जात असून, डहाणूतील मतदारांवर या बदलाचा परिणाम किती होईल, हे येणाऱ्या निवडणूक निकालावरून स्पष्ट होईल. विशेषतः, बहुजन विकास आघाडीने हा निर्णय निवडणुकीतील आपला प्रभाव गमावल्याचे सूचक मानले जात आहे. आता भाजप आणि विरोधी पक्षांमधील चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT