नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा विचार करावा, अशी मागणी काँग्रेसने केली. ईव्हीएमवर सतत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून प्रश्न उपस्थित केले जातात. लोकसभा निवडणुकांपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत ईव्हीएममध्ये बिघाड आणि छेडछाड झाल्याच्या तक्रारी देखील केल्या जातात. हरियाणा विधानसभा निवडणूक निकालानंतरही काँग्रेसने ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता काँग्रेस बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी बुधवारी पुन्हा एकदा सुचवले की, भारतीय निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा विचार करावा. तिवारी यांनी लोकशाहीचे रक्षण करण्याचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, जगभरात, कोणत्याही अपवादाशिवाय, भारतापूर्वी ज्या देशांमध्ये ईव्हीएमचा शोध लागला किंवा वापरला गेला. तेथेही प्रत्येकजण बॅलेट पेपर वापरत आहेत. कारण लोकशाही इतकी मौल्यवान आहे की ती तंत्रज्ञानाने बदलली जाऊ शकत नाही.
निवडणूक आयोगाने केवळ गांभीर्याने विचार न करता या देशाला बॅलेट पेपरकडे नेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. तंत्रज्ञानाला सोडून लोकशाही खूप मौल्यवान आहे. नुकत्याच झालेल्या हरियाणा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा काँग्रेसचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळल्यानंतर काँग्रेस नेत्याचे हे वक्तव्य आले आहे. तर हे आरोप निराधार, खोटे आणि तथ्यहीन असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते.
मंगळवारी, काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, निवडणुकीनंतर निराधार दावे करु नये. तसेच पक्षावर पुराव्याशिवाय संशय निर्माण केल्याचा आरोप केला. अशा बेजबाबदार आरोपांमुळे सार्वजनिक अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असा इशारा निवडणूक आयोगाने दिला. विशेषत: मतदान आणि मतमोजणीच्या दिवसांसारख्या संवेदनशील काळात, असे करू नये म्हटले आहे
या मुद्द्यावरून भाजप नेते तरुण चुग यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. त्यांनी काँग्रेसला 'बुडते जहाज' म्हटले आहे. चुग म्हणाले की काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे जे अविचारी आणि अराजकीय आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या पराभवासाठी (निवडणुकीत) ईव्हीएमला दोष देतात. काँग्रेस पक्ष, कर्नाटक असो की तेलंगणातील निवडणूक जिंकतो तेव्हा ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला ठीक मानतो. इतक्या निवडणुका पराभूत होवूनही त्यांचा अहंकार जास्त आहे, असे ते म्हणाले.