पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, त्यांनी आज गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत सायन कोळीवाडा मतदारसंघात रवी राजा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळे ते बंडाच्या पवित्र्यात होते. अखेर त्यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांनी सांगितले की, "रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांची मुंबई भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे..."
''पाचवेळा नगरसेवक आणि मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते राहिलेले रवी राजा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 'उबाठा' चे बाबू दरेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे भाजपमध्ये स्वागत...'' असे फडणवीस यांनी सांगितले.
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईतील कांदिवलीमधून काळू बढेलिया, चारकोपमधून यशवंत जयप्रकाश सिंह आणि सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून गणेश कुमार यादव यांना उमेदवारी देण्यात आली. सायन कोळीवाडा येथून रवी राजा यांनी उमेदवारी मागितली होती. पण त्यांचा पत्ता कट करून युवक काँग्रेसचे गणेश कुमार यादव यांना उमेदवारी दिली. यामुळे ते नाराज झाले होते.
मुंबईत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. पण मुंबईत अनेक जागा ठाकरे गटाकडे गेल्या आहेत. यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.
''काँग्रेस पक्षातील माझ्या ४४ वर्षाच्या सेवेचा सन्मान केला नाही. यामुळे मी पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा देत आहे.'' अशी खंत रवी राजा यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाठवलेल्या राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे. रवी राजा १९८० पासून काँग्रेसशी जोडले गेले होते. त्यांनी मुंबई महापालिकेत विरोधीपक्ष नेतेपद भूषवले होते. त्यांना काँग्रेसचा मुंबईतील चेहरा मानले जाते.