निवडणूक आयोगा file photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

'काँग्रेस हा लोकशाहीविरोधी पक्ष,' निवडणूक आयोगाने फटकारल्यानंतर भाजपचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Poll | काँग्रेसने देशाची माफी मागावी- भाजपची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया संथ गतीने झाल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. निवडणूक आयोगाने मतमोजणीनंतर २० दिवसांनी १६०० पानांचे उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. आयोगाच्या उत्तरानंतर 'काँग्रेस हा लोकशाहीविरोधी पक्ष आहे,' म्हणत भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेसने संवैधानिक संस्थांवर प्रश्न उपस्थित केले

भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले की, 'निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाचा डाव उघड केला आहे. काँग्रेस हा लोकशाहीविरोधी पक्ष आहे, त्यामुळे कोणताही पुरावा नसताना, अर्धसत्य आणि खोट्या बातम्यांच्या आधारे काँग्रेस पक्ष लोकशाही व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. काँग्रेसने निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसने देशात आणीबाणी लावत राज्यघटनेची पायमल्ली केली. सुदृढ लोकशाही काँग्रेस पचवू शकत नाही. लोकशाही कोणाच्या घराण्यानुसार नाही तर कायद्याच्या नियमानुसार चालेल, असेही भंडारी म्हणाले. काँग्रेसने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केल्याप्रकरणी देशाची माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.

बेजबाबदार आरोपांमुळे अशांतता निर्माण होईलः निवडणूक आयोग

हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ ऑक्टोबरला पार पडली. यावेळी मतमोजणीच्या दिवशी २६ विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर मतमोजणीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) कंट्रोल युनिटवर (सीयू) प्रदर्शित होत असलेल्या ९९ टक्के बॅटरीच्या स्थितीबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण मागितले होते. हरियाणा निवडणुकीत काँग्रेसने २६ तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, मतदान आणि मतमोजणीसारख्या संवेदनशील वेळी असे खळबळजनक आरोप करण्यापासून निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना इशारा दिला. अशा बेजबाबदार आरोपांमुळे अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असेही निवडणूक आयोगाने म्हटले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT