चंद्रपूरः अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजपा पक्ष प्रवेशावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजप मध्ये प्रवेश

Maharashtra Assembly poll | जिल्ह्यातील सहाही जागा जिंकणार : मुनगंटीवार

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर: चंद्रपूर मधून अपक्ष निवडून आलेले विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश घेतला. जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाच्या समाजाची सेवा करण्याच्या मिशनला गती येईल आणि भाजपा चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभाच्या जागा प्रचंड मताधिक्याने जिंकून येईल असा विश्वास महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. लवकरच किशोर जोरगेवार यांची भाजपतर्फे उमेदवारी जाहीर होईल अशी घोषणाही त्यांनी आज रविवारी(दि.२७) केली.

उमेदवारीबाबात अनेक घडामोडी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर विधानसभेमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले होते. दररोज घडणाऱ्या वेगवान घडामोडी आणि रोज ताणल्या गेलेली उत्सुकता, निवडणूक नामांकन अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारासह नेत्यांच्याही मुंबई - दिल्ली वाऱ्या यामुळे ही उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल? याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच चर्चा रंगली होती. विविध घडामोडीनंतर अखेर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशामुळे उमेदवारी त्‍यांनाच मिळेल हे निश्चित झाले आहे.

अपक्ष म्‍हणून २०१९ ला केला होता भाजपा उमेदवाराचा पराभव

पूर्वाश्रमीचे भाजपाचे किशोर जोरगेवार यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून भाजपाचे नाना शामकुळे यांचा ७२ हजाराहून अधिक मताने पराभव केला होता. त्यानंतर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपामध्ये प्रवेश करून कमळाचे फुल आपल्या हाती घेतले आहे.

पक्ष प्रवेशावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्‍थित

येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमांमध्ये किशोर जोरगेवार यांचा भाजपमधील प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेश सोहळ्याला भूतपूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ भाजपा नेते प्रमोद कडू, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह काँग्रेस च्या महिला आघाडीच्या अध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांचाही भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT