सोलापूर : महाविकास आघाडीचे उमेदवार खूप चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना धडकी भरली आहे. यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे होम टू होम, पदयात्रा, कॉर्नर बैठकांमधून मतदारांच्या घरोघरी जात आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि. 14) सकाळी प्रभाग क्रमांक एकमध्ये कोठे यांच्या पदयात्रेला नागरिकांनी गर्दी केली होती. या पदयात्रेत कोठे यांच्यासोबत खासदार प्रणिती शिंदे सहभागी झाल्या होत्या. यावेळी ठिकठिकाणी कोठे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत केले. दरम्यान, सकाळी 8 वाजता पदयात्रा सुरू झाली. गणेश मंदिर पंधे कॉलनी, रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, रूपाभवानी चौक, धोत्रीकर वस्ती, प्रभाकर महाराज मठ या भागात पदयात्रा झाली.
बाळे भागात कोठे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढली. ही पदयात्रा बाळे कॉर्नर, पुष्पक हॉटेल, संतोष नगर, अंबिका नगर, क्रांती मित्र मंडळ, नामदेव शिंपी सोसायटी, बाळे गावठाण, खडक गल्ली, खंडोबा मंदिर, मारुती मंदिर भीमनगर आदी परिसरातून काढण्यात आली. कोठे यांना निवडून आणण्यासाठी जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. गेल्या वीस वर्षात मागील आमदाराने कोणतेही काम केली नाही. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड राग आहे.त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे कोठे यांनी सांगितले.