सांगोला : भारतीय जनता पक्ष हा मित्रपक्षांचा वापर करून फेकून देतो. महाविकास आघाडीकडून महिलांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातील. शेतकर्यांच्या उत्पादित मालालाही दर दिला जाईल. भाजप व मिंदे सरकारने अदानीच्या घशात घातलेले सर्व उद्योग परत महाराष्ट्रात आणणार व महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.सांगोला येथे महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक साळुंखे-पाटील यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
सांगोल्याच्या गद्दार आमदाराचे पुण्याजवळ 25 कोटी रुपये सापडले. पण दाखवण्यात आले केवळ पाच कोटी. यासाठी केेंद्र व राज्य सरकारने सहकार्य केले, अशी टीकाही त्यांनी केली. ठाकरे म्हणाले, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात येऊन प्रचार करत आहेत. त्यांनी पंतप्रधान व गृहमंत्रिपद सोडून भाजपच्या प्रचारप्रमुखाची भूमिका घ्यावी. कलम 370 रद्द करताना शिवसेनेनेही पाठिंबा दिला होता, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भाजप हे सहकारी पक्षांना ईडीची भीती दाखवून आपल्याकडे घेते. त्यांचा वापर करून टाकून देते असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
सहकार क्षेत्र हे महाराष्ट्र राज्याचे आहे. पण केंद्र सरकारने सहकार क्षेत्र हा एक नवीन विभाग तयार करून तो अमित शहा यांच्याकडे ठेवला आहे. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे व अदानीसारख्या उद्योजकांना विकण्याचा घाट घातला आहे. सध्याचे मिंदे सरकार हे राज्यातील उद्योेग अदानीला देत आहे. भाजप सरकारने सर्व उद्योग गुजरातला नेल्याचा आरोपही त्यांनी केला. आमचे सरकार सत्तेवर आल्यास गुजरातला गेलेले सर्व उद्योग परत महाराष्ट्रात आणू. तरुणांच्या हाताला काम मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले. साळुंखे पाटील म्हणाले, सांगोला तालुक्यात तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी तालुक्यात चार ठिकाणी एमआयडीसीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. डाळिंब संशोधन केंद्र व डाळिंबावर प्रक्रिया करणारा उद्योग सांगोल्यात उभा राहिला पाहिजे, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या.
मिंदे सरकारमधील ‘काय डोंगर काय झाडी काय हॉटेल’ या खोकेधारक आमदाराला शिवसेनेने आमदार केले होते. ते त्यांनी विसरून जाऊन पक्षाशी गद्दारी केली. अशाला मातीत गाडले पाहिजे.