राज्य विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा आज सोमवारी विधानसभेत करण्यात आली. (Image source- @rahulnarwekar)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Rahul Narwekar | विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा विराजमान, एकमताने निवडीची घोषणा

Maharashtra Assembly session : राहुल नार्वेकर यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले अभिनंदन

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपचे आमदार राहुल नार्वेकर विराजमान झाले आहेत. त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा आज सोमवारी विधानसभेत करण्यात आली. आज विधानसभेत यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर नार्वेकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आला होता. विरोधी पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आज त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी सभागृहात प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांच्या एकमताने निवडीची घोषणा केली.

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे सभागृहात अभिनंदन केले. विधानसभा अध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखल्याने विरोधी पक्षांचे आणि नेत्यांचे मी आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले. न्याय देण्याचे काम आपल्याकडून होईल. त्याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही, असा विश्वास फडणवीस यांनी नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्त केला. ते अभ्यासू, संयमी व्यक्तिमत्व असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सचिवालयात रविवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. आज सोमवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवारी दुपारी बारापर्यंत अर्ज भरण्याचा वेळ होता. या कालावधीत महायुतीचे उमेदवार म्हणून केवळ नार्वेकर यांचाच अर्ज दाखल झाला. २८८ जागांच्या सभागृहात भाजपप्रणीत महायुतीकडे तब्बल २३७ इतके भक्कम संख्याबळ असल्याने महाविकास आघाडीने अध्यक्ष पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झालेत.

नार्वेकरांकडील विधानसभा अध्यक्षपदाचा सत्ताधारी पक्षाला मोठा फायदा

शिंदे- फडणवीस सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राहुल नार्वेकर यांच्याकडेच विधानसभेचे अध्यक्षपद राहिले होते. वकिली पेशा आणि कायद्याचे अभ्यासक असलेल्या नार्वेकरांकडील विधानसभा अध्यक्षपदाचा सत्ताधारी पक्षाला मोठा फायदा झाला. विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर सुरू झालेल्या कायदेशीर लढाईत नार्वेकरांची वकिली कामी आली. सर्वोच्च न्यायालयाने मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादीवरील दावेदारीचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे दिली. त्यानंतर नार्वेकरांनी दोन्ही खटल्यात प्रत्यक्ष सुनावणी घेत निकाल सुनावला. राहुल नार्वेकर हे यंदा मंत्री पदासाठी इच्छुक होते. मात्र त्यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामुळे भाजपकडून मुंबईतून कोणाला मंत्रिपद दिले जाणार याबाबत उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT