बारामती : Maharashtra Assembly Polls | बारामतीत महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार हेच उमेदवार असतील, हे आता जाहीर झाले आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हेच उमेदवार असतील. गुरुवारपर्यंत त्यांच्या उमेदवारीची घोषणा होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे लोकसभेनंतर बारामतीत विधानसभेला पुन्हा पवार विरुद्ध पवार अशीच लढत होईल, अशी चिन्हे आहेत.
अजित पवार यांच्या उमेदवारीबद्दलची संदिग्धता आता संपली आहे. ते सोमवारी (दि. 28) अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांच्या विरोधातील उमेदवाराबद्दलच उत्सुकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हेच विरोधातील उमेदवार असतील. कुटुंबातील लढाई टाळण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला. परंतु, बारामतीत असा काही प्रकार केला, तर राज्यभर वेगळा संदेश जाईल, हाही विचार पुढे आला. शिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यासाठी अनुकूल नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तो असफल ठरल्याचे बोलले जात आहे. परिणामी, अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हेच निवडणूक लढवतील, असेच चित्र आहे. (Maharashtra Assembly Polls)
एकीकडे अजित पवार यांचा प्रचार तालुक्यात सुरू झाला आहे. दुसरीकडे युगेंद्र यांनी लोकसभा विजयानंतर लागलीच कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत मोठे आव्हान उभे करू शकतील, अशी सध्याची स्थिती आहे. युगेंद्र यांच्या मागे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उद्योजक श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सुनंदा पवार, आमदार रोहित पवार यांचे पाठबळ असेल. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होईल, अशी चिन्हे आहेत. (Maharashtra Assembly Polls)