महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. 
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला दुखापत

Attack on Anil Deshmukh : भाजपच्या मते ही स्टंटबाजी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Attack on Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात देशमुख जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कारमध्ये चालकाच्या शेजारी असलेल्या सीटवर अनिल देशमुख बसलेले असून त्यांच्या गाडीची काच फुटल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल या त्यांच्या परंपरागत विधानसभा मतदारसंघात यावेळी त्यांच्याऐवजी सुपुत्र सलील देशमुख निवडणूक लढत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा शांत झाल्यानंतर ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. या मतदारसंघातील नरखेड येथील आज (दि. 18) निवडणूक प्रचाराची सांगता सभा आटोपून देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत होते. त्यानंतर ही घटना घडली.

काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात लोकांनी देशमुख यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात देशमुख हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी आधी काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले. नंतर नागपूरकडे नेण्यात येत असल्याची माहिती देशमुख यांच्या निकटवर्तीयानी दिली.

या घटनेने काटोल नरखेड भागात राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

भाजपच्या मते ही स्टंटबाजी

दरम्यान, भाजप नेते व काटोल विधानसभा प्रमुख अविनाश ठाकरे यांनी मुलाचा पराभव दिसत असल्याने देशमुख यांची ही स्टंटबाजी आहे असा आरोप केला आहे. भाजप कार्यकर्त्यांवर त्यांनी केलेला हा आरोप गंभीर असून आज भाजपचे सर्व कार्यकर्ते बूथनियोजनात व्यस्त असल्यामुळे रस्त्यावर कोणीच नव्हते. त्याच्यामुळे हा आरोप निरर्थक असल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT