भंडारा : पुढारी वृत्तसेवा - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वेटिंगवर असलेल्या इच्छुकांना याही निवडणुकीत संधी नाकारल्याने नाराज झाले. यातील अनेक नेत्यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. त्यांच्या या प्रकारामुळे पक्षीय उमेदवारांची मात्र गळचेपी होत आहे.
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून वर्षानुवर्षे तयारी केली जाते. जनतेशी संपर्क साधण्यासाठी आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. त्यांच्या कार्यक्रमाला वरिष्ठ नेते हजेरी लावतात. इतके वर्ष काम करुन ऐनवेळी नवीन येणाऱ्याला तिकीट दिले जाते, तेव्हा पक्षातील काही नेते बंडखोरी करण्यास वाव देतात. अशीच परिस्थिती तिन्हीही विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काही नेत्यांनी तिकीट मिळेल, या आशेने मेहनत घेतली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा वरिष्ठ नेत्यांसोबत दौरा केला. वेळ आणि पैसाही खर्च केला. मात्र शेवटच्या क्षणी लोकसभा निवडणुकीचे तिकीट दुसऱ्याला देण्यात आले.
आता विधानसभा निवडणुकीत विरोधकांशी हातमिळवणी करून गुप्त बैठका घेतल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने काही नेते पक्षाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अपक्ष उमेदवारांसोबत प्रचार करताना दिसत आहेत. भंडारासह तिन्हीही विधानसभा मतदारसंघात बंडखोर नेते आहेत. तिकीट न मिळाल्यास पक्षाविरोधात बंडखोरी करून आपल्या समाजातील मतदारांवर प्रभाव टाकण्याची तयारी केली आहे.