मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांनी सोमवारी माहिम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अमित यांच्याकडे १४ कोटी ८८ लाखांची संपत्ती आहे. त्यांच्याकडील मालमत्तेपेक्षा त्यांची देणी वैशिष्टयपूर्ण आहेत. आई शर्मिला ठाकरेंचे ते ३ कोटी ६६५ लाख ३७ हजार २३५ रूपयांचे देणे लागतात. शिवाय, आई, आज्जी, बहिण आणि पत्नीचेही ते देणे लागतात. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातच अमित यांनी या बाबींचा खुलासा केला आहे.
अमित ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार मागील आर्थिक वर्षातील त्यांचे उत्पन्न ४९ लाख ८९ हजार १४० आणि पत्नी मिताली यांचे ४५ लाख १६ हजार २३० इतके होते. विविध बँकातील ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्स असे सर्व मिळून त्यांची जंगम मालमत्ता ही १२ कोटी ५४ लाख १३ हजार ८६२ इतकी आहे. तर, पत्नीची संपत्ती १ कोटी ७२ लाख ७३ हजार २६७ इतकी आहे. तर, अमित यांनी स्वतः घेतलेल्या स्थावर मालमत्तेची किंमत आज १ कोटी २९ लाख १६ हजार ८०० इतकी आहे.
अमित ठाकरे यांच्याकडे तीन तोळे सोने आहे. तर, अमित ठाकरे यांच्यावर घरच्यांच्या कर्जाचा आकडा चार कोटींचा आहे. त्यात आई शर्मिला यांचे ते ३ कोटी ६६५ लाख ३७ हजार २३५ रूपयांचे देणे लागतात. तर, आज्जी मधुवंती यांच्याकडून १ लाख ६१ हजार त्यांनी घेतले आहेत. बहीण उर्वशीचे २१ हजार ६७४ आणि पत्नी मिताली यांचे ४७ लाख ७१ हजार १५ रूपयांचे देणे त्यांच्यावर आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधात कोणताच गुन्हा नोंदविला गेलेला नाही. तर, मुंबई विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज चे शिक्षण पूर्ण केले आहे.