नवी दिल्ली : गेले काही दिवस काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोण, यावर खल सुरू आहे. यामध्ये अनेक नावे समोर येत असली तरी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. अमित देशमुख यांच्या नावासाठी राज्यातील एका बड्या नेत्याने पक्षश्रेष्ठींकडे साकडे घातल्याचेही समजते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. लोकसभेत काँग्रेसने चांगली कामगिरी केली मात्र त्यानंतर केवळ ६ महिन्यात काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या जिव्हारी लागला नसेल तर नवलच. त्यानंतर काँग्रेसने संघटनात्मक बदल करणार असल्याचे संकेत दिले. असे असले तरी आतापर्यंत कोणतेही मोठे संघटनात्मक बदल पक्षात झाले नाहीत. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर अमित देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी गेल्या काही दिवसांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजीत कदम या नेत्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अखेर अमित देशमुख यांचे नाव अंतिम करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य विधिमंडळात काँग्रेसचा गटनेता कोण असेल, यावर अद्यापही निर्णय झाला नाही. अमित देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले तर त्यांच्या रूपाने हे पद मराठवाड्यात असेल. प्रादेशिक समतोल साधण्यासाठी काँग्रेसला विधिमंडळ गटनेते पद विदर्भात द्यावे लागेल कारण आमदारांची संख्या तिथे आहे. त्यामुळे अमित देशमुख जर प्रदेशाध्यक्ष झाले तर विधिमंडळ गटनेते पद विदर्भात राहील, अशाही चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.