World Hottest Cities India Pudhari
महाराष्ट्र

World Hottest Cities: जगातील 50 सर्वात उष्ण शहरं भारतात; महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश? IMD कडून रेड अलर्ट

World Hottest Cities India: जगातील सर्वाधिक उष्ण 50 शहरांमध्ये भारतातीलच शहरांचा समावेश असून त्यातील अर्ध्याहून अधिक शहरं उत्तर प्रदेशातील आहेत.

पुढारी वृत्तसेवा

World Hottest Cities India: देशभरात उष्णतेची लाट सुरू असताना भारतातील अनेक शहरांमध्ये तापमानाने अक्षरशः कहर केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6:15 वाजता परिस्थिती इतकी गंभीर होती की, जगातील सर्वाधिक उष्ण 50 शहरांमध्ये भारतातील सर्वात जास्त शहरांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या यादीत सर्वाधिक शहरं एका राज्यातील होती आणि ते राज्य म्हणजे उत्तर प्रदेश.

हवेची गुणवत्ता आणि तापमानावर लक्ष ठेवणाऱ्या AQI.in च्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील टॉप 50 सर्वाधिक उष्ण शहरांपैकी अर्ध्याहून अधिक शहरं उत्तर प्रदेशातील आहेत. यात मुरादाबाद, इटावा, प्रयागराज, आग्रा, वाराणसी, बरेली, मथुरा, गाझीपूर, अलीगड यांसारख्या शहरांमध्ये तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसदरम्यान होते.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील नागपूर हे शहर 44 अंश सेल्सिअस तापमानासह अव्वल स्थानावर होते. नागपूरसह छत्तीसगडमधील रायपूर, महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्येही एवढ्याच तापमानाची नोंद झाली.

50 Hottest Cities Globally

उत्तर प्रदेश इतकं का तापतंय?

हवामान तज्ज्ञांच्या मते, यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भौगोलिक स्थान. उत्तर प्रदेश हे इंडो-गॅंगेटिक (Indo-Gangetic Plain) मैदानाच्या मध्यभागी आहे. राजस्थान आणि मध्य भारतातून येणारे उष्ण, कोरडे वारे राज्यात कोणत्याही मोठ्या डोंगररांगा किंवा अडथळ्यांशिवाय थेट पोहोचतात. त्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात पसरते.

ढगांचा अभाव

साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे उत्तर आणि पूर्व भारतात पोहोचू लागतात. त्यामुळे ढगांची संख्या वाढते आणि तापमान काहीसं कमी होतं. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. मान्सून दक्षिण भारतात सक्रिय होत असताना उत्तर भारतात अजूनही कोरडी हवा कायम आहे. त्यामुळे दिवसा सूर्याचा तडाखा वाढत आहे आणि रात्रीही तापमान फारसं कमी होत नाही.

शहरांमधील काँक्रीटचा सापळा

आग्रा, प्रयागराज, वाराणसी आणि बरेलीसारख्या शहरांमध्ये अर्बन हीट आयलंड इफेक्ट मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. शहरांमधील काँक्रीट, डांबरी रस्ते आणि दाट बांधकाम दिवसभर उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती हळूहळू सोडतात. त्यामुळे सूर्य मावळल्यानंतरही उकाडा कायम राहतो.

याशिवाय, बुंदेलखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये जमिनीतील ओलावा कमी झाला आहे, तसेच झाडांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक गारवा मिळत नाही.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. “अत्यंत तीव्र उष्णतेची लाट” निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ही आकडेवारी संध्याकाळच्या वेळेतील आहे. सामान्यतः सूर्यास्तानंतर तापमान कमी होण्यास सुरुवात होते. मात्र, उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये रात्रीसुद्धा तापमान 43 अंशांच्या वर असल्याने चिंता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT