Ajit Pawar Irrigation Scam: राज्यातील जलसिंचन प्रकल्पांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक धक्कादायक दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. 1995 ते 1999 या काळात भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने जलसिंचन प्रकल्पांची किंमत जाणीवपूर्वक वाढवली गेली, असा गंभीर आरोप अजित पवारांनी केला आहे. विशेष म्हणजे ही वाढ पार्टी फंडासाठी केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले की, 1999 साली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आल्यानंतर जलसंपदा खाते त्यांच्याकडे आले. त्या वेळी पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची एक फाईल त्यांच्या टेबलवर आली. कागदपत्रे पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला, कारण त्या प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी रुपये दाखवण्यात आली होती.
मात्र चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सत्य समोर आणले. मूळ प्रकल्पाची किंमत अवघी 200 कोटी रुपये होती. पण त्याआधीच्या सरकारच्या काळात 100 कोटी रुपये ‘पार्टी फंडासाठी’ वाढवण्यात आले आणि त्यावर अधिकाऱ्यांनी स्वतःचे 10 कोटी जोडून एकूण रक्कम 310 कोटी करण्यात आली, अशी कबुली त्या अधिकाऱ्याने दिल्याचा दावा अजित पवारांनी केला.
'ती फाईल आजही माझ्याकडे आहे. त्या वेळी जर त्या प्रकरणावर कारवाई केली असती, तर राज्यात मोठा हाहाकार माजला असता,' असं अजित पवारांनी सांगितलं. विशेष म्हणजे त्या काळात जलसंपदा खाते भाजपकडे होते.
दरम्यान, या आरोपांवर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “1999 साली मी अर्थमंत्री होतो. अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाल्याचे मला आठवत नाही,” असे सांगत त्यांनी अजित पवारांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, “जर ही माहिती खरी असेल तर अजित पवारांनी तब्बल 25 वर्षे ती का दडवून ठेवली?” असा सवालही खडसेंनी केला आहे.
अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे जलसिंचन प्रकल्पांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. जुन्या फाईल्स आणि त्यामागील हेतू यावर आता नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.