अहमदनगर

सारी उमर हमे संग रहेना है..! रक्षाबंधनाचा अमृत महोत्सव साजरा करणारी 80 वर्षीय भावंडे

अमृता चौगुले

देवदैठण : पुढारी वृत्तसेवा : 'सारी उमर हमे संग रहेना है, एक हजारों मे मेरी बहेना है… !' हे गाणे कित्येक वेळा आपण पाहिले वा ऐकले आहे. लहानपणी सर्वच बहीण-भाऊ मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करतात. मात्र, पुढे लग्न झाल्यावर प्रत्येक बहीण-भावाची भेट होतेच असे नाही. त्यामुळे मग बर्‍याच भावंडांमधे राखी बांधण्याच्या कार्यक्रमात इच्छा असूनही खंड पडतो. मात्र गेल्या 80 वर्षांपासून आपल्या लाडक्या भावाला राखी बांधणारी आणि तितक्याच उत्साहाने तिच्याकडून राखी बांधून घेणारे वयोवृद्ध बहीण-भाऊ असे दुर्मिळ चित्र पाहावयास मिळत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील संत निंबराज देवस्थानचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दंडवते (वय 81) यांना राखी बांधण्यासाठी त्यांची थोरली बहीण रुक्मिणी पांडुरंग कुलकर्णी (वय 88) यांनी आजही तितक्याच उत्साहाने भावाच्या हातावर राखी बांधून आनंदाश्रूंनी रक्षाबंधन साजरे केले. रुक्मिणी यांनी आपल्या पेक्षा सात वर्षांनी लहान असणार्‍या लक्ष्मीकांत उर्फ बाळच्या हातावर अगदी पहिल्या वर्षापासून राखी बांधायला सुरुवात केली. त्या दरवर्षी राखी पौर्णिमेला माहेरी येतात. तसेच, अचानकपणे कामानिमित्त वा आजारपणामुळे येणे शक्य झाले नाही, तर अशावेळी लक्ष्मीकांत हेच बहिणीच्या घरी जाऊन हातावर राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा करायचे. वयाची 80 वर्षे पार केल्यानंतरही या दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झाले नाही.

सध्याच्या स्वार्थी युगात वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणी वा हक्काहून आज वाद घालणार्‍या बहीण भावांसाठी निंबराज-रुख्मिणी यांचे प्रेम निश्चितच प्रेरणा देणारी वा नाते टिकविण्याची शिकवण देणारे आहे. रुक्मिणी यांना चार मुले, सुना, पाच नातू, एक नात, चार पणतू व एक नात जावई असा परिवार आहे. तर लक्ष्मीकांत यांना एक मुलगा, सून, दोन मुली, तीन नाती, एक नातू व एक जावई असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT