कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहरातील बहुतांश प्रभागात विकासाच्या काही ना काही समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत. हे जनता दरबाराच्या माध्यमातून समोर आले, मात्र जुना प्रभाग क्रमांक चार व सध्याचा पाच या प्रभागाच्या नागरिकांनी मांडलेल्या समस्या पाहता या प्रभागात मागील काही वर्षात विकास झालाच नाही, असे दिसत आहे. या प्रभागाला समस्यानगरीच म्हणावे लागेल, असे उपहासात्मकपणे ना. आशुतोष काळे म्हणाले.
कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी कोपरगाव शहरात 'नामदार आपल्या दारी' हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. काळे यांनी 16 रोजी प्रभाग क्र. 5 मधील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी समस्यांचा पाऊस पाडला. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांनी या प्रभागाला समस्यानगरीच म्हणावे लागेल, असे ते म्हणाले.
यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ. गायत्री कांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव रेखा जगताप, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, मायादेवी खरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैनरार, इम्तियाज अत्तार, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.