अहमदनगर

संगमनेर : 11 ऑगस्टपर्यंत पडणार सर्वाधिक पाऊस : हवामान तज्ञ पंजाबराव डख

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा सर्वात जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज वर्तवून आज रविवारपासून सोमवार व मंगळवारी उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख आज संगमनेरला आले होते. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. डख म्हणाले, 7 ते 11 ऑगस्ट या पाच दिवसांच्या कालावधीत पुणे, मुंबई, नाशिकसह पूर्व व पश्चिम विदर्भ तसेच मराठवाड्यासह राज्यातील सर्वच भागांमध्ये कमी- अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे.

रविवार व सोमवार या दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीच्या कामाचे योग्य नियोजन करावे , असे आवाहन डख यांनी केले. पूर्वी मान्सूनचा पाऊस मुंबईकडून पूर्वेकडे यायचा. त्या पावसामध्ये विजा पडण्याचे प्रमाण कमी होते, मात्र यावर्षी पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडे येऊ लागला आहे. त्यामुळे पाऊस सुरू असताना वीज पडण्याची शक्यता अधिक असते. म्हणून शेतकर्‍यांनी झाडाखाली डोंगरावर, मोकळ्या जागेत, शेत तळ्याजवळ उभे न राहता थेट घराकडचा रस्ता धरावा, असा सल्ला डख यांनी शेतकरी बांधवांना दिला आहे.

डख म्हणाले, शेतकरी बांधवांनो, निसर्ग तुमच्या पाठिमागे लागला आहे, असे तुम्हाला वाटत असेल. परंतु, त्या निसर्गाला अजिबात घाबरू नका, असा दिलासा देत शेतकरी बांधवांना एक वर्ष अगोदरच पावसाचा अंदाज देईल. शेतकरी बांधवांचे शेतमालाचे नुकसान होऊ देणार नाही, याची मी दक्षता घेईल, असा विश्वास डख यांनी व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्रात 11 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरु असणार आहे. 12 ते 16 ऑगस्ट या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे.

त्यानंतर पुन्हा 17 ऑगस्टला पुन्हा एक मोठे चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचे डख यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात 28 ऑक्टोबरपासून थंडी..!
महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस पडणार आहे. 2 ते 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून माघारी निघायला सुरुवात होणार आहे. मान्सून माघारी जात असताना 24 ऑक्टोबरला पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. 28 ऑक्टोबरपासून थंडी पडण्यास सुरुवात होणार आहे, असे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात 28 ऑक्टोबरपासून थंडी सुरु होणार असल्याचे डख म्हणाले.

SCROLL FOR NEXT