अमोल गव्हाणे :
श्रीगोंदा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना तालुक्यात दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढविण्याच्या मानसिकतेत होते. आता मात्र राज्यात सत्ताबदल झाल्याने दोन्ही काँग्रेसला एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नसल्याची भावना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
गेल्या काही महिन्यात झालेल्या निवडणुकांत काँगेस, राष्ट्रवादीचे नेत्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाल्याने पक्ष पातळीवर दरी निर्माण झाली. त्यात अन्य निवडणुकापेक्षा विधानसभा निवडणुकीचीच चर्चा रंगू लागल्याने अंतर्गत कलहामध्ये आणखी भर पडली.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पुढील काही महिन्यात होत आहे. गट, गण रचना अस्तित्वात आल्यानंतर अनेक इच्छुकांनी जरी तयारी सुरू केली असली, तरी दोन्ही काँगेस एकत्र असल्याशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरायला फारसे कोणी इच्छुक दिसत नाहीत.
निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरे गेल्यास कार्यकर्त्यांना संधी मिळू शकेल. पक्षाची ताकद दिसेल, ही भूमिका नेत्यांची असली, तरी दुसरीकडे दोन्ही काँगेस वेगळे लढल्यास त्याचा फायदा विरोधी, अर्थात भाजपला होऊ शकतो. हा कार्यकर्त्यांचा युक्तिवादही बेदखल करून चालणार नाही. दोन्ही काँगेसच्या मतांची विभागणी झाली, तर बहुतांश गटात त्याचा फटका बसणार आहे, हे वास्तव नेत्यांना विचारात घ्यावे लागणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने तालुक्यात अनेक नेत्यांचे राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानले जात होते. मात्र राज्यात सत्ता बदल होताच, त्या मंडळीनीही यू टर्न घेत पक्ष प्रवेश लांबणीवर टाकला आहे. याच सत्ताबदलाचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर होऊ शकतो, ही भूमिका लक्षात घेऊन स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाणे धाडसाचे ठरेल.
विधानसभा निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी बाकी असताना अनेकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. आता जर आपली ताकद दाखवून दिली, तरच विधानसभा निवडणूक सोपी जाईल, हा नेत्यांचा व्होरा असला, तरी कार्यकर्ते त्याला फारसे अनुकूल असल्याचे दिसत नाहीत.
आरक्षणानंतर गतिमान हालचाली
तालुक्यात सात गटांची निर्मिती झाली आहे. कोणत्या गटात कोणते आरक्षण निघते, यावर इच्छुकांची गोळाबेरीज ठरणार आहे. इच्छुकांनी भेटी गाठी सुरू केल्या असल्या, तरी 13 जुलै रोजी आरक्षणाची सोडत आहे. त्यानंतर या हालचाली अधिक गतिमान होतील.
एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू
नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अनेक कार्यकर्ते मला भेटत आहेत. जवळपास सर्वच कार्यकर्त्यांनी दोन्ही काँगेसने एकत्रित लढावे, अशी भूमिका व्यक्त केली आहे. अंतर्गत काही मतभेद असले, तरी एकत्र बसून त्यावर तोडगा काढण्याची आमची तयारी आहे.
नेत्यांचे दौरे सुरू
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर जवळपास सर्वच नेते सक्रिय झाले आहेत. या निवडणुका विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणार असल्याने आतापासूनच नेत्यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.