अहमदनगर

शेवगाव : विजेच्या धक्क्याने खिलारी बैलाचा मृत्यू

अमृता चौगुले

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील भाऊसाहेब भानुदास घोरतळे यांच्या पन्नास हजार रुपये किमतीच्या खिल्लार बैलाचा गावठाणलगत विद्युत जनित्राचा वीजप्रवाह जमिनीत उतरल्याने चिकटून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 8) सकाळी 11 च्या सुमारास घडली.

घटनेबाबत माहिती अशी आहे की, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील गरीब कुटुंबातील शेतकरी भाऊसाहेब घोरतळे यांनी महिन्यापूर्वीच उसनवारी करून एक लाखाची खिल्लारी बैलजोडी शेतीसाठी खरेदी केली होती. शुक्रवारी सकाळी 10 च्या दरम्यान बैलांना चरण्यासाठी सोडण्यात आल्यानंतर तासाभराच्या अंतराने विद्युत जनित्रालगत चरत असलेला बैल अचानक जमिनीवर कोसळला.

हे पाहून मुलगा लक्ष्मण याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, बैलाचा मृत्यू झाला होता. विजेचा धक्का लागल्याने त्यांनी महावितरणच्या उपकेंद्राला फोन करून माहिती दिली. बोधेगाव उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता पंकज मेहता यांनी तत्काळ कर्मचार्‍यांना बनसोडे जनित्रालगतच्या घटनास्थळी पाठवले. वायरमन श्याम शिंदे, संजू थोरात यांनी वीजप्रवाह बंद करून लोखंडी पोलला चिकटलेली जंपची वायर काढून टाकत विद्युत प्रवाह सुरळीत केला.

बोधेगाव पशू वैद्यकीय दवाखान्याचे डॉ. जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन बैल मृत झाल्याचे सांगितले. घटनास्थळी पवन भोंगळे, सिद्धांत घोरतळे, संजय बनसोडे, भीमा बनसोडे यांनी मदत कार्य केले. शेतकरी, गरीब कुटुंबातील असल्याने शासनाने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT