शिर्डी : पुढारी वृत्तसेवा: कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतरच्या सात महिन्यात श्रीसाईबाबांच्या झोळीत साई भक्तांनी तब्बल 188 कोटी 55 लाख रुपयांचे दान अर्पण केले. या काळात 41 लाख भाविक श्रीसाई चरणी नतमस्तक झाल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
कोरोना महामारीनंतर श्रीसाई मंदिर सुरू झाले. गत सात महिन्यांत साई भक्तांनी बाबांच्या झोळीत भर- भरून दान दिले आहे. ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत 188 कोटी 55 लाख रुपये श्रीसाईंच्या तिजोरीत जमा झाले आहे. मंदिर उघडल्यानंतर पाच महिन्यात 41 लाख भाविकांनी श्रीसाई समाधीचे दर्शन घेतले.
श्रीसाईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. सलग सुट्टीच्या दिवसात दोन ते तीन लाख भक्त श्रीसाईबाबा समाधीचे दर्शन घेतात. कोरोना संकट काळात दोन वर्षे मंदिर भाविकांसाठी बंद होते, मात्र त्यानंतर मंदिर खुले झाल्यापासून भाविकांचा शिर्डीला येण्याचा ओघ पूर्ववत झाल्याचे समोर आले.
कोविडच्या दोन वर्षांच्या कालखंडात शिर्डीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली होती. पहिल्या लॉकडाऊनमध्ये 17 मार्च 2020 मध्ये साई मंदिरचे द्वार भाविकांसाठी बंद झाले, ते तब्बल आठ महिने. 16 नोव्हेंबर 2020 रोजी साईमंदिर उघडले. पुन्हा कोविड निर्बंध सुरु झाल्याने 5 एप्रिल 2021 रोजी श्रीसाईमंदिर पुन्हा बंद झाले होते.
यानंतर महाराष्ट्र सरकारच्या परवानगीने 7 आक्टोबर 2021 रोजी ते भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी निर्बंध कडक होते, मात्र शिर्डीला श्रीसाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती. श्रीसाई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत म्हणाल्या, 7 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत 41 लाखांहून अधिक भाविकांनी श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. 7 ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत 188 कोटी 55 लाख 31 हजार 971 रुपयांच्या देणग्या श्रीसाईंच्या तिजोरीत जमा झाल्या आहेत.