अहमदनगर

शिक्षक बँक निवडणूक : गुरुमाउलीची फूट, विरोधकांना संधी?

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षक बँक निवडणुकीचा धुराळा जोरात उडू पाहत आहे. सर्वच शिक्षक मंडळांकडून बैठका, मेळाव्यांतून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. बैठकांच्या नावाखाली जेवणावळीतून 'गुरुजी'ना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, गत निवडणुकीतील राजकीय परिस्थिती, 'त्या-त्या' मंडळाला पडलेली मते, आजची बदललेले राजकीय स्थित्यंतरे आणि संभाव्य युती-आघाडीची चर्चा लक्षात घेता ही निवडणूक सत्ताधार्‍यांसह कुणालाही वाटते तितकी सोपी नसल्याचेच स्पष्ट दिसते आहे.

शिक्षक बँकेची गत पंचवार्षिक निवडणूक ज्येष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले गुरुजी आणि बापूसाहेब तांबे या दोन्ही शिक्षक नेत्यांच्या नेतृत्वात गुरुमाउली मंडळाने निवडणूक लढवली. तर, गुरुकूलचे नेते डॉ. संजय कळमकर यांनी इब्टाला सोबत घेवून तुल्यबळ उमेदवार दिले. सदिच्छा व ऐक्य मंडळांने एकत्र येवून 'गुरूमाऊली आणि गुरुकूल'ला सक्षम पर्याय उभा केला होता.

या निवडणुकीत गुरुमाउलीच्या 21 उमेदवारांनी विजय मिळवित एकहाती सत्ता काबाजी केली. 'गुरुमाउली'च्या प्रत्येक उमेदवारांस सरासरी 4200 मते पडली होती. गुरुकुल व इब्टा मंडळाच्या उमेदवारांना सरासरी 3100, तर सदिच्छा आणि ऐक्यने सरासरी 2200 मते मिळवली होती. 'मतविभाजन' हेच गुरुमारुलीच्या यशाचे आणि गुरुकुल व सदिच्छाच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.

गुरुमाउलीच्या रोहोकले व तांबे यांच्यामध्ये फूट पडली आहे. हे दोन्ही मंडळे आज कट्टर विरोधक बनली आहे. या दोघांचे मतविभाजन 'गुरुकुल'ला आयती चालून आलेली संधी आहे. मात्र, येथेही फुटीचे वारे जोरात वाहत आहे. कळमकरांचे काही लोक उमेदवारीसाठी अगोदर 'गुरुजीं'च्या मंडपात जागा धरून बसले आहेत.

शिवाय, बँकेची सत्ता असतानी त्यांनी केलेला कारभार सभासद अजुनही विसरलेली नाहीत. त्यामुळेच सदिच्छा, ऐक्य ही दोन्ही मंडळे गुरुकुलसोबत जाण्यास फारसे इच्छूक नसल्याचीही चर्चा आहे. याशिवाय इब्टा, शिक्षक भारती, स्वराज्य सारखे छोट्या-मोठ्या संघटनांनाही काही दिवसांपासून पंख फुटल्याने तेही स्वःताचे अस्तित्व दाखवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येणारी निवडणूक ही तिरंगी की चौरंगी, होणार याकडे लक्ष असून बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे ही निवडणूक कुणालाही वाटते तितकी सोपी नसल्याचे लपून राहिलेले नाही.

मेळाव्यातील शक्तीप्रदर्शनासाठी 'टार्गेट'!
सध्या सर्वच मंडळांचे मेळावे सुरू आहेत. या मेळाव्यांवर लाखोंची उधळपट्टी सुरू आहे. ज्यांना उमेदवारी हवी आहे, त्यांना मेळाव्यासाठी सभासद शिक्षक उपस्थितीचे टार्गेट दिले जात आहे. त्यासाठी लागणारा खर्चही 'त्या' संभाव्य उमेदवारालाच करायचा आहे, असा कार्यक्रम बहुतांशी मंडळांनी हाती घेतल्याचे दिसते, तर या उलट छोट्या मंडळांची आर्थिक कुवत नसल्याने त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या 'घोंगडी' बैठका सहानुभूती निर्माण करत आहेत.

SCROLL FOR NEXT