अहमदनगर

वयोश्री योजनेत नगर जिल्हा देशात अव्वल : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अमृता चौगुले

राहुरी/धानोरे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने अहमदनगर जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर आला आहे, असे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेचा मोठा आधार ज्येष्ठ नागरिकांना मिळाल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले. तालुक्यातील सोनगाव, सात्रळ येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेत पात्र लाभार्थींना मंजूर झालेल्या साधन साहित्याचे वितरण मंत्री विखे पा. यांच्या उपस्थित करण्यात आले. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, डॉ. विखे पा. सहकारी साखर कारखाना व्हा.चेअरमन विश्वासराव कडू, आप्पासाहेब दिघे, दीपक पाटील, सुभाषराव अंत्रे, नानासाहेब गागरे, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार कुंदन हिरे, राहुरीचे तहसीलदार फैज्जुदीन शेख आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पा. यांच्या उपस्थितीत विविध गावांमधील 700 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना साधन, साहित्याचे वितरण करण्यात आले. आतापर्यंत नगर जिल्ह्यात केलेल्या नोंदणीनुसार 16 हजार लाभार्थींना साधन, साहित्य देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंत्री विखे पा. म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजना कार्यान्वित झाली. खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्या प्रयत्नांमुळे या योजनेची सुरुवात नगर जिल्ह्यात होऊ शकली. याकामी त्यांनी मोठी मेहनत घेतली. तालुकानिहाय नोंदणी पूर्ण करून, मंजूर झालेल्या लाभार्थींना साधन, साहित्य आता वितरित होत आहे. सर्वाधिक नोंदणी करुन ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळवून देणारा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याचा नावलौकीक देशात झाल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

कोविड संकटात देशातील जनतेला सर्व स्तरावर केंद्र सरकारचा आधार मिळाला. या संकटाने रोजगार बंद झाल्याची जाणीव ठेवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले. आज अडीच वर्षांनंतरही या योजनेचा लाभ मिळत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोरोना लसीचे उत्पादन देशातच व्हावे, यासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केली.

लसीचे उत्पादन यशस्वीपणे झाल्यामुळेच देशातील 200 कोटी नागरिकांना मोफत डोस मिळाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लक्षात घेऊन 75 दिवसांचा तिसर्‍या मोफत बुस्टर डोस देण्याची मोहीम सुरू असून, सर्व नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले. एनडीआरएफच्या तरतुदीपेक्षा राज्यातील शेतकर्‍यांना मदत दुप्पट देणार असल्याचे सांगतानाच केंद्र सरकारनेसुद्धा देशातील शेतकर्‍यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाकरिता अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी सांगितले.

बिघाडी सरकारचा कारभार फक्त वसुलीचा होता!
यापुर्वी सत्तेतील तीन पक्षांच्या सरकारमध्ये जनतेच्या हिताचा कोणताही कार्यक्रम राबवला गेला नाही. बिघाडी सरकारचा कारभार फक्त वसुलीचा होता, असे टाकास्त्र सोडून, शिंदे- फडणवीस सरकार हे आता जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आल्याने नागरीकांच्या हिताचे निर्णय घेण्यास सरकारने प्राधान्य दिल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले.

शेतकर्‍यांना मदत..!
राज्यात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 3 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT