अहमदनगर

राहुरीत हाणामार्‍यांच्या घटनांमध्ये वाढ !

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. चोरीमारी या घटनांबरोबर कौटुंबिक हिंसाचार, अल्पवयीन मुलींचे अपहरण, महिलांच्या विनयभंगाच्या घटनांचाही आलेख उंचावल्याचे दिसत आहे. या सर्व घटनांवरून पोलिस प्रशासनाची जरब कमी झाल्याचे चित्र आहे.

शहर व तालुक्यातील एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या घटनांची पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. यामध्ये पहिली घटना ही तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे घटली. घरासमोरील ओट्यावर बसलेल्या महिलेला शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 29 जून रोजी घडली.

शालिनी लक्ष्मण गायकवाड (वय 45, रा. मालूंजा खुर्द, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 29 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान शालिनी गायकवाड या त्यांच्या घरासमोरील ओट्यावर बसल्या होत्या. तेव्हा त्या ठिकाणी आरोपी आले. तुम्ही दोन दिवसांपूर्वी रस्त्यावरील काट्या का काढल्या? या कारणावरुन आरोपींनी शिवीगाळ करून लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ते भांडण सोडविण्यासाठी त्यांचा पुतण्या तेथे आला. त्याला देखील लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करून दमदाटी केली.

शालिनी लक्ष्मण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष लहानू गायकवाड, पोपट लहानू गायकवाड, आनंदा दगडू गायकवाड, विलास दादा गायकवाड (सर्व रा. मालुंजा खुर्द, ता. राहुरी) या चार जणांवर मारहाण व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटनाही याच गावात घडली. काटे काढण्याच्या कारणावरून एका महिलेला मारहाण करून भांडणे सोडविण्यासाठी गेल्या महिलांचे दागिणेही लांबविण्यात आले. या मारहाणीत महिला व पुरूष असे एकूण सहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर श्रीरामपूर येथील कामगार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

एका 25 वर्षीय तरूणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भारत कारभारी आढाव, सचिन कारभारी आढाव, शरद सुभाष आढाव, मच्छिंद्र विष्णू रिंगे, मदन लक्ष्मण रिंगे, सुभाष यादव आढाव, आण्णासाहेब दादा सोळूंके, बाळासाहेब कारभारी आढाव (सर्व रा. मालूंजा खुर्द, ता. राहुरी) या आठ जणांवर मारहाण, विनयभंग, जिवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी घटना म्हैसगाव येथे घडली. जालिंदर सुर्यभान बर्डे (वय 29, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) या तरूणाने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दिनांक 23 जून रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान जालिंदर बर्डे हा तरूण म्हैसगाव येथील स्मशानभूमी जवळ शौचालयाला जात असताना त्याने आरोपींवर व त्यांच्या मोटरसायकलवर बॅटरीचा फोकस मारला. तेव्हा आरोपी त्याला म्हणाले की, आम्ही डॉन आहोत. त्यावर जालिंदर बर्डे त्यांना म्हणाला की, तूम्ही कुठले डॉन आहात, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी त्याला लाथा बूक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली.

SCROLL FOR NEXT