अहमदनगर

राहुरी : संत महिपती महाराज दिंडीला तीनशे वर्षांची परंपरा

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात प्रती पंढरपूर समजल्या जाणार्‍या संत महिपती महाराज यांचा पायी दिंडी सोहळा तीनशे वर्षांपासून अविरतपणे सुरूच आहे. हजारो भाविक भक्त दिंडीत सहभागी होऊन मनोभावे व विधिवत पुजासंस्काराने भागवत सांप्रदायाच्या सोपस्काराने वारसा पुढे नेत आहेत.

या दिंडी सोहळ्याविषयी माहिती देताना श्री संत कवी महिपती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यातील श्रीसंत कवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याला सुमारे 300 हून अधिक वर्षांची परंपरा आहे. संत महिपती महाराजांनी पांडुरंगाला ताहाराबाद भेटीचे पत्र लिहिले होते.

त्या पत्राला प्रत्यक्ष पांडुरंगांनी उत्तर पाठवून ताहाराबादला येण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे दरवर्षी दिंडीने वारकरी पांडुरंगाला आणण्यासाठी जातात, त्यांच्यानंतर आषाढ वद्य नवमीला दिंडी पांडुरंगाला घेऊन ताहाराबाद येथे पोहोचते. त्याची प्रचिती म्हणून आषाढ अमावस्येला पाऊलघडीचा कार्यक्रम होतो.

यामध्ये भगवान परमात्मा पांडुरंग जाताना आपल्या पाऊलखुणा सोडून जातात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी वारकर्‍यांची प्रचंड गर्दी असते. नवमीपासून देवस्थानच्यावतीने उत्सव सुरू असतो. अशी ऐतिहासिक परंपरा या दिंडी सोहळ्याला लाभली आहे. राहुरी तालुक्यात वसलेले हे देवस्थान तालुकावासियांचे नव्हे तर जिल्ह्यातील भाविकांचे मोठे शद्धास्थान म्हणून गणले जाते. यालाच 'पांडुरंगउत्सव' किंवा 'गोपालकाला' असे म्हणतात.

अद्यापही ही परंपरा अत्यंत मनोभावे व विधिवत पूजासंस्काराने भागवत संप्रदायाच्या सोपस्काराने पाळली जात आहे. राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडे डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथून श्रीक्षेत्र पंढरपूर वारीला कवी महिपती महाराज यांचे वडील विठ्ठलपंत यांनी 300 वर्षांपूर्वी दिंडी सोहळ्याला प्रारंभ केला. त्यांच्यानंतर महिपती महाराजांनी ही परंपरा सुरू ठेवली.

महाराजानंतर त्यांच्या वंशजांनी वारी सुरू ठेवली. त्यांच्यानंतर वै. धनाजी बाबा गागरे मांडवेकर, त्यानंतर माणिकबाबा यांनी ही वारी अखंडितपणे सुरू ठेवली आहे. आता कवी महिपती महाराज देवस्थानच्यावतीने ही दिंडी सोहळ्याची परंपरा सुरू ठेवण्यात आली आहे.
महिपती महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यात सुमारे 2 हजारांपेक्षा अधिक भाविकांचा समावेश असतो.

पंढरपूर येथे महिपती महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याला मानाचे स्थान आहे. सन 1986 साली देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. त्यानंतर या परिसराचा विकास झाला व दिंडीची व्याप्ती वाढत जाऊन आज तालुक्यात सर्वात मोठी व प्रमुख दिंडी गणली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT