राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कामगार वसाहत येथे मंगळवार (दि 21) रात्री अविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सौरभ नाना निकम (वय 19) असे आत्महत्या करणार्या अविवाहित तरुणाचे नाव आहे. रात्री 8 वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलिस तब्बल दीड ते दोन तासांनंतर दाखल झाले आहे. पंचनामा करण्याची प्रकिया सुरू होती. दरम्यान, आत्महत्येच्या घटनेबाबत राहुरी फॅक्टरीचे बिट हवालदार दिनकर गर्जे व सुनील निकम यांना घटनेबाबत तातडीने माहिती दिली. मात्र, तब्बल दोन तास उलटले, तरीही पोलिस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
मृतदेह तसाच लटकलेल्या अवस्थेत होता. मृताचे नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी पोलिस गर्जे व निकम यांना फोनवर संपर्क करून घटनास्थळी येण्याची विनवणी केली. घटनास्थळी येण्याऐवजी दोघेही उंटावरून शेळ्या हाकत होते. आम्हाला तेच काम आहे का? पोलिसांना संपुर्ण तालुका पाहावा लागतो. 'जो मेला तो मेला' मेलेल्या माणसासाठी काय एवढी गडबड करायची असे 'उर्मट' उत्तर बिट हवालदार दिनकर गर्जे यांनी दिले.
घटनास्थळी नातेवाईकांनी पोलिसांच्या नावाने मोठा संताप व्यक्त केला. राहुरी फॅक्टरी परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी बिट हवालदार निकम व गर्जे दोन्ही पोलिस कर्मचारी गुन्हेगारी रोखण्यास अपयशी ठरत आहे.