नगर : पुढारी वृत्तसेवा : 'कत्तलची रात्र' मिरवणुकीत टेंभ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाकडून शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाला आमचे सहकार्य राहील, असे आश्वासनही यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिले. मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत विविध संघटना व यंग पार्ट्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
यावेळी पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, अजित पाटील, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, संपत शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, युवराज आठरे, राजेंद्र सानप आदींसह पोलिस अधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मागील काही वर्षांपासून मोहरम उत्सवांतर्गत रात्रीच्या वेळी काढल्या जाणार्या कत्तलची रात्र मिरवणुकीमध्ये टेंभे पेटवून सवारी बरोबर घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्यावेळी काही घटना घडल्या होत्या. आज तशी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे मिरवणुकीमध्ये टेंभ्यांना पुन्हा परवानगी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
टेंभ्यांना परवानगी का नाकारण्यात आली होती, बंदी का घालण्यात आली होती, याची माहिती घेतली जाईल. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल. मोहरम उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. मिरवणुकीमध्ये डीजेवर बंदी घालण्यात आली असून, केवळ दोन स्पीकरला परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाच्या सूचनांचे व निर्बंधांचे पालन करून शांततेत उत्सव साजरा करावा, असे आवाहन सौरभ अग्रवाल यांनी केले.
500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे 500 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील 155 व्यक्ती, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले 24 गुन्हेगार, गैरवर्तन करण्याची शक्यता असणार्या 127 व्यक्तींना शहर पोलिसांकडून नोटिसा पाठविण्यात येणार असून, त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली.