अहमदनगर

मोफत दर्शनाची केवळ 119 जणांना संधी, 181 नगरकर पर्यटकांचा ‘मूडऑफ’

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा

नगर शहरातील ऐतिहासिक व धार्मिकस्थळांच्या मोफत दर्शनसाठी स्थापनादिनापासून 28, 29 व 30 मे हे तीन दिवस  मोफत शहर बस ठेवण्यात आली होती. त्यात 300 नगरकरांनी नावनोंदणी केली होती. त्यातील 119 जणांना संधी मिळाली. तर, 181 नगरकर पर्यटकांचा मूडऑफ झाला.

शहराच्या स्थापनादिनी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून नगर शहर स्थापना दिनापासून तीन दिवस नगरकरांसाठी शहर बसद्वारे मोफत नगर दर्शन ठेवण्यात आले होते. त्यासाठी एक बसची व्यवस्था करण्यात आली होती.
शहर स्थापना दिनाच्या अगोदर पर्यटक नगरकरांनी अधिकृतरित्या नावनोंदणी केली होती.

या नावनोंदणीमध्ये सुमारे 300 नगरकरांनी नोंदणी केली. दररोज एक बस पर्यटकांसाठी ठेवण्यात आली होती. एका बसच्या क्षमतेनुसार तीन दिवस 119 नगरकर पर्यटकांनी पर्यटनाची संधी मिळाली. त्यात लहान मुलांसह महिला, पुरुष वृद्ध आजी-आजोबांनी नगरदर्शनचा लाभ घेतला.

परंतु, 181 पर्यटक नगरकर शहराच्या ऐतिहासिक व धार्मिकस्थळांच्या दर्शनाला मुकले. पर्यटकांची संख्या वाढल्याने अनेकांनी पदाधिकारी व अधिकार्‍यांना फोन करून हा उपक्रम दोन दिवस वाढविण्याची मागणी केली होती. मात्र, मनपाकडून त्यास मान्यता देण्यात आली नाही.

या पर्यटनस्थळांना भेटी

या तीन दिवसांत नगरकर पर्यटकांना ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर माळीवाडा, अरणगाव येथील अवतार मेहेरबाबा समाधीस्थळ, श्री संत बुबाजी बुवा मंदिर, फर्‍याबाग, भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, डोंगरगण, पिंपळगाव माळवी तलाव, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय आदी धार्मिक व ऐतिहासिक स्थळे नगरकर पर्यटकांना दाखविण्यात आली.

नगर दर्शनासाठी नोंदणी केलेल्या अनेकांना संधी मिळाली नाही. त्यामुळे दर रविवारी दिवसराचे तिकीट ठरवून नगर दर्शनसाठी एक बस देण्याचा विचार सुरू आहे. त्यावर अधिकारी व पदाधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
                                                                       – गणेश भोसले,
                                                                 उपमहापौर, महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT